कोल्हापूर : रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशांशी नाते असते. ते नाते कायम गोड राखण्यासाठी व रिक्षाचालकांना समाजात सन्मान मिळावा, या हेतूने ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या वतीने मंगळवारी दैवज्ञ बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या व्हायोलिनवादनाचा आनंद कोल्हापुरातील अनेक रिक्षाचालकांनी मनमुराद लुटला.अनाम प्रेम संस्थेच्या वतीने दरवर्षी रिक्षाचालकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत मंगळवारी सकाळी व्हायोलिनवादक मिलिंद रायकर, यज्ञेश रायकर व शिष्य यश भावसार, गुणवंतसिंग (तबला साथ) यांच्या साथीने ‘इंद्रायणीच्या काठी’ हे भजन, तसेच शुद्ध सारंग हा राग आळवला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमास शेकडो रिक्षाचालकांनी विशेष उपस्थिती लावली होती. दरम्यान, प्रामाणिक रिक्षाचालक सूर्यकांत हजारे, महेश शेवडे, राजेंद्र शिंदे यांचा सत्कार अनुक्रमे नेमीनाथ चौगुले, राजेंद्र वोरा, एस. आर. कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते झाला.यावेळी राहुल ठाकूर, अतुल ठाकूर, दत्तात्रय केळुस्कर, प्रकाश केळुस्कर, संजय पोवार, नागेश नागवेकर, दीपक कांबळे, शिवाजी चौगुले यांच्यासह मुंबई, कोकणातील अनाम प्रेमी उपस्थित होते. विशेष म्हणजे हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, चेतना अपंगमती, वडगाव कर्णबधीर शाळा, ज्ञानप्रबोधिनी अंध शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रामाणिक रिक्षाचालकांसाठी वाजले व्हायोलिनचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:54 AM