लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरामध्ये नगरपालिका व पोलीस प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम राबविली होती. थोरात चौक परिसरात कारवाई करत असताना कर्मचाऱ्याने एका खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या पैशाच्या गल्ल्यात हात घालून कारवाई करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.
प्रशासनाकडूनच जबरदस्तीने कारवाई करत असल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगरपालिका व पोलिसांनी शहरातील मुख्य चौकात कारवाई करण्यास सुरुवात केली. थोरात चौकात एका खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या पैशाच्या गल्ल्यात हात घालून कारवाई करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. शहरात काही वेळातच ही बातमी व्हिडिओसह वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नगरपालिकेत व्यापाऱ्यांनी हा व्हिडिओ सर्वांना दाखविला, तसेच आक्रमक होत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधित व्यापाऱ्याने त्या कर्मचाऱ्याने गल्ल्यातून पैसे घेतले नसून, आपणच एक हजार रुपयांची पावती केल्याचे सांगितले.