कोल्हापूर : आधीच धरणांत सरासरी ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे; त्यातच मान्सून वेळेत दाखल होत असल्याने आणि आता वादळी पावसाने थैमान घातल्याने पाटबंधारे विभाग अधिक सतर्क झाला आहे. ‘वारणे’तून विसर्ग कायम असून, ‘राधानगरी’तून मात्र विसर्ग थांबविण्यात आला आहे. अन्य धरणांतून नियमित आवर्तने सुरूच असल्याने सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.
गेल्या आठवड्यात कमालीचा उष्मा होता; त्यामुळे पिकांची होरपळ वाढली होती. पाण्याची मागणी वाढल्याने नद्या बऱ्यापैकी कोरड्या पडलेल्या दिसत होत्या; पण जिल्ह्यात जूनच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने वळवाच्या स्वरूपाने जोरदार एंट्री केली आहे. त्यामुळे शेतीसाठीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे. परिणामी, नद्याही काठोकाठ भरून वाहू लागल्या आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षीचा महापूर, अतिवृष्टी यांमुळे जानेवारीपर्यंत शेतीला पाण्याची मागणी राहिली नाही. त्यानंतर मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचीही पाण्याची मागणी घटली. या सर्वांचा परिणाम म्हणून धरणातील पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आजच्या घडीला सर्वच धरणांत सरासरी ३० टक्के पाणीसाठा आहे.
आजच्या घडीला ‘राधानगरी’तून ८०० क्युसेक विसर्ग सुरू होता; पण तो मंगळवारी सकाळी थांबवण्यात आला. ‘वारणे’तून नदीपात्रात १५३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अन्य धरणांतील नियमित आवर्तने सुरू असून, अतिरिक्त विसर्ग अजून सुरू केलेला नाही.