कोल्हापूर : चाफोडी येथील माध्यमिक विद्यालयातील गणिताचे शिक्षक विशाल किसनराव पोतदार यांना शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील शैक्षणिक विचारमंचने शनिवारी ‘डी. बी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित केले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे, जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार प्रमुख उपस्थित होते.
पोतदार यांनी गणितासाठी ब्लॉग, व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या स्मार्ट पीडीएफचा लॉकडाऊनमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना उपयोग झाला. त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पोतदार यांना वडील किसनराव, मुख्याध्यापक एस. बी. कानडे, देवी लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. एस. झेंडे, सचिव एस. पी. सुतार, खजानीस एस. व्ही. मुदगल यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (१८०१२०२१-कोल-विशाल पोतदार (पुरस्कार) : कोल्हापुरात शनिवारी चाफोडी येथील माध्यमिक विद्यालयातील गणिताचे शिक्षक विशाल पोतदार यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याहस्ते ‘डी. बी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी शेजारी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.