कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणविरोधी मोहिमेत झालेल्या तोडफोडीमुळे बाधित झालेल्या गजापूरपैकी मुसलमानवाडी (ता. शाहुवाडी) येथील नागरिकांना बुधवारी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येकी ५० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. जिल्हाधिकारी अमाेल येडगे बुधवारी विशाळगडावरच होते. यावेळी ५६ कुटुंबांना हे अर्थसाहाय्य देण्यात आले. माेहरममुळे बुधवारी गडासह परिसरातील अतिक्रमणे काढली गेली नाहीत. मात्र, आज गुरुवारपासून उर्वरित सर्व बांधकामे उतविण्यात येतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.रविवारी विशाळगड अतिक्रमणविरोधी माेहिमेदरम्यान समाजकंटकांनी दगडफेड, फोडाफोडी करून मुस्लीम कुटुंबीयांची घरे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. गजापूरपैकी मुसलमानवाडी येथील अंदाजे ४१ घरांची जमावाने नासधूस करून घरातील साहित्याचे मोठे नुकसान केले होते. या नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करून शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केला आहे. वाडीमध्ये ५६ कुटुंबे राहतात. या कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून बुधवारी जिल्हाधिकारी येडगे यांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्यासाठी २५ हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी ४१ घरांना प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशाव्दारे देण्यात आले. नुकसानीचे घरनिहाय पंचनामे करून पुढील दोन दिवसात ते शासनाला सादर केले जाणार आहेत.आजपासून पुन्हा अतिक्रमण काढणारसोमवार व मंगळवारी या दोन दिवसात प्रशासनाच्या वतीने विशाळगड परिसरातील जवळपास १०० अतिक्रमणे काढण्यात आली. बुधवारी मोहरम असल्याने ही मोहीम थांबवली गेली. मात्र परिसरात आणखी १५ ते २० अतिक्रमण काढायची बाकी आहेत. आज गुरुवारपासून पुढील दोन दिवसात ही कारवाई पूर्ण केली जाईल.
Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: गजापूरमधील पीडितांना प्रत्येकी ५० हजारांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:06 PM