कोल्हापूर : विशाळगडाजवळील गजापूर येथे झालेल्या हिंसाचार जाळपोळीमुळे लोकशाही विचारांना गालबोट लागले असून जनतेला शांततेचे आवाहन करण्यासाठी इंडिया आघाडी व शाहूप्रेमींच्यावतीने उद्या गुरुवारी (दि.१८) दुपारी चार वाजता शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची कोल्हापूर ही भूमी आहे. या भूमीवर धार्मिक द्वेष पसरवत अशांतता माजवणाऱ्यांचा उन्माद खपवून घेतला जाणार नाही. कोल्हापुरात शाहू महाराजांचा विचार हा जनतेने केंद्रस्थानी मानला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचाराच्या जनतेने विशाळगडच्या घटनेचा निषेध केला असून शांततेचे आवाहन करण्यासाठी शिवशाहू सद्भावना रॅली काढण्यात येईल. शाहू समाधिस्थळ ते शिवाजी पुतळा अशी ही रॅली निघेल. यामध्ये कोल्हापुरातील सर्व नागरिकांनी जात, धर्म, पंथ, संघटना, गट, तट विसरून शाहू महाराजांच्या विचारांसाठी एकत्र येत रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, व्ही. बी. पाटील, आर. के. पवार, गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे यांनी केले.
विशाळगड जाळपोळ प्रकरण: कोल्हापुरात उद्या शिवशाहू सद्भावना रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 4:35 PM