आंबा : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला आंदोलकांनी हिंसक वळण देऊन जातीपातीमधील तेढ वाढवले हे दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी गुरुवारी दुपारी गजापूरला भेट देऊन नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पवार सुमारे दोन तास या परिसरात होते. त्यांनी बारकाईने अधिकाऱ्यांकडून या सर्व प्रकाराची माहिती घेतली.मंत्री पवार म्हणाले, कोणतीही संघटना असो किंवा पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी समाजामध्ये सलोखा टिकवण्याचे काम करण्याची गरज आहे. आमचे सरकार पहिल्या दिवसापासून येथील घटनेवर लक्ष ठेवून आहे. बारकाईने येथील घटनेची खात्री करण्यास आलो. बांधवांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. निष्पाप व्यक्तींना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करू. आपदग्रस्तांना नियमानुसार भरपाई दिली जाईल.पवार यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे प्रशासन यंत्रणा दुपारी सज्ज होती. कोल्हापूरहून येण्याऐवजी सांगली जिल्ह्यातून गजापूरला आले. प्रार्थनास्थळासह तोडफोड केलेल्या घरांची व वाहनांची त्यांनी पाहणी करून कुटुंबातील सदस्यांच्या वेदना समजून घेतल्या. यावेळी त्यांनी व्यावसायिक अतिक्रमणे प्राधान्याने काढली जातील. तिथे कोणताही भेदभाव होणार नाही असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाऊन कोणताच निर्णय होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी आमदार राजेश पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे त्यांच्यासोबत होते.
संभाजीराजे थांबले असते तर ..पत्रकारांशी बोलताना मंत्री पवार म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी संभाजीराजेंनी धरलेल्या आग्रहाबाबत चर्चा करण्यास सरकार सकारात्मक होते. जिल्हा प्रशासन त्यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. दोन दिवसांनी चर्चेतून उत्तम मार्ग काढण्याची तयारी शासनाने दर्शवली होती. दोन दिवस ते थांबले असते तर आंदोलनाला हिंसक वळण लागले नसते. कोणताही जमाव एकदा आक्रमक झाला की कुणाचे कोण ऐकत नाही. हेच इथे घडले आहे. याआधीही अनेकदा असे अनुभव आले आहेत.