कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याच्या मुद्यावरून गडाच्या पायथ्याशी हिंसाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला संशयित रवींद्र पडवळ याने मंगळवारी (दि. १) कणेरी मठावरील संत संमेलनात हजेरी लावली. या संमेलनात रामगिरी महाराजांशी संवाद साधल्याचा व्हिडीओ त्याने स्वत:च सोशल मीडियात शेअर केला. मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असलेल्या समारंभात उघडपणे वावरत असूनही तो पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी १४ जुलै २०२४ रोजी विशाळगडाच्या पायथ्याला आंदोलनाची हाक दिली होती. तत्पूर्वीच पुण्यातील हिंदू बांधव समिती आणि कोल्हापुरातील सेवाव्रत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या पायथ्याला हिंसाचार केला. या प्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात रवींद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांच्यासह ३०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले होते.यातील ३० संशयितांना पोलिसांनी अटक केली. मात्र, पडवळ आणि साळोखे हे दोघे प्रमुख पसार झाले होते. मंगळवारी कणेरी मठावर झालेल्या संत संमेलनात पडवळ याने हजेरी लावून रामगिरी महाराजांची भेट घेतली. त्याने स्वत:च या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हगंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेला संशयित पडवळ हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संबोधित करणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतरच तो येऊन गेल्याची चर्चा सुरू होते. त्याचा पोलिसांना काहीच मागमूस नसेल हे पटण्यासारखे नाही. त्यामुळेच पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.