कोल्हापूर : भृगूऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारल्याने अपमानित झालेली लक्ष्मी करवीर स्थानी आली. तिच्या पुनर्प्राप्तीसाठी भगवान विष्णूने येथे दहा वर्षे अंबाबाईची तपश्चर्या केली. तिच्या आशीर्वादाने विष्णू आणि लक्ष्मीची पुनर्भेट झाली. सप्तमीला (बुधवारी) भगवान विष्णू अंबाबाईची तपश्चर्या करीत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. अज्ञानातून झालेल्या गैरसमजातून कोल्हापूरची अंबाबाई हीच विष्णूपत्नी लक्ष्मी असल्याचा गैरसमज झाला आहे. वास्तविक तिरुमला युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेल्या ‘व्यंकटाचल महात्म्य’ या ग्रंथात विष्णूने आपली पत्नी लक्ष्मीच्या पुनर्प्राप्तीसाठी अगस्ती मुनींनी आराधना केलेल्या अंबाबाईसमोर दहा वर्षे तपश्चर्या केली. अंबाबाईने विष्णूला तिरुपती येथील सुवर्णमुखरी नदी तिरावर तपश्चर्या कर. तेथेच तुला लक्ष्मी भेटेल, अशी आज्ञा दिली. विष्णूने तिरुपतीमध्ये पुन्हा बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर बालाजी रूपातील विष्णू-लक्ष्मीचे पुनर्मिलन झाले. सप्तमीला म्हणजेच बुधवारी करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा या कथाभागानुसार बांधण्यात येणार आहे. आपल्याकडे अंबाबाई हीच विष्णू पत्नी असल्याचा गैरसमज झाला आहे. खरंतर विष्णूने आद्यशक्ती म्हणून अंबाबाईची उपासना केली होती. या पूजेमुळे देवीचा खरा इतिहास प्रकाशात येण्यास मदत होईल, अशी माहिती श्रीपूजक धनश्री व सागर मुनीश्वर यांनी दिली. (प्रतिनिधी)
सप्तमीच्या पूजेला विष्णू करणार अंबाबाईची आराधना
By admin | Published: September 30, 2014 12:50 AM