कोल्हापूर : गोकुळमधील तब्बल तीन दशकांनंतर सत्तांतर घडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विश्वास नारायण पाटील यांच्याच गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडणार, हे जवळपास निश्चित आहे. आज शुक्रवारी दुपारी एक वाजता होणाऱ्या निवड सभेत त्याची औपचारिक घोषणा होणार आहे. दरम्यान, अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी गुरुवारी दिवसभर नेते व संचालकांच्या स्वतंत्र बैठका होऊन वैयक्तिक मते आजमावली गेली. यानंतरही नाव निश्चित न झाल्याने अखेर अध्यक्षपदाचे दावेदार असलेले विश्वास पाटील व अरुण डाेंगळे यांच्यापैकी एक नाव लिफाफ्यात बंद करण्यात आले. तो लिफाफा आज निवडीआधी उघडला जाणार आहे.
आज शुक्रवारी दुपारी गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. १७ विरुध्द ४ असे बलाबल असल्याने विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने अध्यक्ष निवड बिनविरोध होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेजवर सत्ताधारी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. दोन सत्रात ही बैठक झाली. पहिल्या सत्रात सकाळी सत्ताधारी आघाडीतील सहभागी सर्व नेत्यांची बैठक घेऊन अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा झाली. यानंतर संध्याकाळी साडेचारच्यासुमारास सत्ताधारी सर्व संचालकांना बैठकीला बोलावण्यात आले. एकत्रित चर्चेऐवजी प्रत्येक संचालकाला स्वतंत्रणपणे बोलावून त्यांच्याकडून अध्यक्षपदाबाबतचे वैयक्तिक मत आजमावून घेतले गेले.
चौकट
दोन्ही दावेदारांमध्ये रस्सीखेच
अध्यक्षपदावरून संचालकांची वैयक्तिक मते आजमावून घेतल्यानंतर मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी या पदाचे प्रमुख दावेदार असलेले विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना बोलावून घेत त्यांनी एकत्र बसून आपापसातील चर्चेनंतर दोघांपैकी एक नाव द्यावे, असा तोडगा काढला. यानंतर बराच वेळ हे दोघे बंद खोलीत चर्चा करत होते, पण त्यांच्यात एकमत होत नव्हते. अध्यक्षपदाच्या दोन टर्म करायच्या, तर आधी कोण असणार यावरून दोघांमध्ये बरीच रस्सीखेच झाल्याचे समजते.
चौकट
अशीही दक्षता
कोरोनाचा संसर्ग वाढला असताना, अध्यक्ष निवडीवरून गर्दी झाली, असा चुकीचा संदेश जनतेमध्ये जाऊ नये म्हणून गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजवर घेतलेल्या संचालकांच्या बैठकीत बाहेरील कुणालाही प्रवेश देण्यास सक्त मनाई केली. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बैठकीपासून लांबच ठेवले.