कळे - वेळ - सायंकाळी ७ वाजणेची... ठिकाण, सावर्डे तर्फ असंडोली ( ता. पन्हाळा ) हे गाव... बाळंतपणासाठी आलेल्या माहेरवाशीण गर्भवती महिलेच्या अचानक पोटात वेदना सुरु झाल्याने तिला कोणत्याही परिस्थितीत दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. पण संपूर्ण गावालाच अतिवृष्टीने कुंभी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा असल्याने दवाखान्यात दाखल करणे अशक्यच वाटत होते. पण ही बातमी सामाजिक कार्यकर्त्यांनी कळे पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. प्रमोद सुर्वे यांच्या कानावर घातली. बोट चालवणारा चालक ६ वाजल्यानंतर घरी गेला असतानाही त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही गर्भवती महिलेस धरण फाट्यापर्यंत घेऊन या मी कोणत्याही परिस्थितीत बोट पाठवून देतो म्हणून सांगितले.
ही परिस्थिती त्यांनी कळे पोलीस स्टेशन मध्ये सांगताच पोलीस हवालदार अशोक निकम हे बोटीचे सारथ्य करण्यास तयार झाले. ते स्वत: ,पोलीस नाईक सागर पाटील आणि अमोल नाईक ( कळे) , शैलेश हांडे ( माजनाळ), भूषण जाधव ( नावली ) , दिलदार जाधव ( नावली) या चार साथीदारांना घेऊन पुराच्या पाण्यातून सुमारे १ किलोमिटरचा प्रवास करुन गर्भवती महिलेस दवाखान्यात दाखल करण्यासाठी कळे धरणफाट्यापर्यंत बोट घेऊन गेले. या ठिकाणी सर्व प्रकारची काळजी घेत गर्भवती महिलेसोबत दोन महिलांना घेऊन बोटीतून कळे येथे पोहोच केले. सामाजिक कार्यकर्ते संजय दिनकर पाटील व एकनाथ शंकर पाटील यांनी कळे पोलीस स्टेशन पासून कळे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत खासगी वाहनाची सोय करुन पेशंट दवाखान्यात सुखरुप पोहोचवले. दवाखान्यात जे.एम्. भास्कर व त्यांच्या स्टाफने तत्काळ उपचार केले.
महापूराच्या परिस्थितीत एखाद्या देवदूताप्रमाणेच पोलीस हवालदार अशोक निकम व पोलीस नाईक सागर पाटील यांनी या महिलेच्या मदतीला धावून जात मानवी संवेदना पोलीस दलात जागृत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. महापुराच्या परिस्थितीत रात्रीच्या सुमारास पोलीस यंत्रणेकडून करण्यात आलेले मदतकार्य हा कर्तव्याचा भाग असला तरी ऐनवेळी यंत्रणा कामाला लागल्याने गर्भवती महिला सुखरुप असल्याचे समाधान सहा.पो. निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी व्यक्त केले. युवक काँग्रेसचे राकेश काळे , आनंदा दिनकर पाटील, भिकाजी काळे, अमित काळे, रोहित काळे, संकेत काळे यांचेही सहकार्य लाभले.