कोल्हापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती रविवारी अत्यंत गंभीर बनली होती. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती म्हणून प्रा. एन. डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे गेल्यावर त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने बोलणे बंद झाले. डॉक्टर त्यांच्या उपचारावर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती ढासळत होती. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर विविध नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विटरद्वारे एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शेतकरी-कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी धडाडीने सोडविले. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा दिला. सतत नवीन विचारांचा ध्यास ही त्यांची ओळख होती. सुमारे २२-२३ वर्ष त्यांनी विधिमंडळ गाजविले. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी लाभलेला नेता हरपला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
गेले ७ दशकं अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचे साक्षीदार, धडाडीचे कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खाच्या समयी त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एन. डी. पाटील यांनी गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचे काम केले आहे. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. १५ जुलै १९२९ रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते.