कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत करताना अनेक व्यक्ती, संस्थांनी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या, मात्र बालवयातच शिवाजी विद्यापीठातील विविध विभागाची माहिती करुन घेण्याचा संकल्प केलेल्या येथील शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ परिसरातील विविध विभागांना भेट देत माहिती घेतली.कोल्हापूरातील शिवाजी मराठा हायस्कूल ही जुनी शाळा. या शाळेत शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी हे प्रामुख्याने शहरातील गरीब आणि दुर्बल घटकातील. त्यामुळे त्यांच्या जाणीवा समृध्द करण्यासाठी तसेच त्यांना दैनंदिन घडामोडींचा परिचय करुन देण्यासाठी या शाळेतील उपक्रमशील शिक्षक नेहमीच धडपडत असतात.
या शाळेमार्फत आतापर्यंत या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून शाळाबाह्य शिक्षण देण्याचा नाविण्यपूर्ण आणि अनोखा प्रयत्न सातत्याने सुरु असतो. याचाच एक भाग म्हणून गेल्याच महिन्यात बालस्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक पी. डी. काटकर, कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या शाळेतील या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देउन नववर्षाचे अनोखे स्वागत केले.
देशातील विविध भागातून आणून लावलेल्या वनस्पती आणि संरक्षित करून ठेवलेल्या विविध प्रजाती या वेळी विद्यार्थ्यांना पाहता आल्या. बालवयातच आपल्या भागातील विद्यापीठाची ओळख व्हावी हा या भेटीमागचा उद्देश होता. इयत्ता पाचवी ते दहावीपर्र्यतचे विद्यार्थी तसेच सविता प्रभावळे, सुतार आदी शिक्षक या भेटीमध्ये सहभागी झाले होते.