कोल्हापूर : पोलीस दलातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी राज्यातील पोलीस मुख्यालयासह सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अभ्यागत कक्ष नेमून, लाच मागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंद ठेवण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत लवकरच अभ्यागत कक्ष पाहायला मिळणार आहेत. कमी श्रमात जास्त पैसे मिळविणे, वरिष्ठांचे दुर्लक्ष, यामुळे पोलीस दलामध्ये लाच स्वीकारण्याचा फंडा वाढत आहे. पैशाच्या मोहापुढे खाकी वर्दीची नाचक्की होत आहे. अशा लाचखोर प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी पोलीस महासंचालक दीक्षित यांनी राज्यातील सर्वच पोलीस मुख्यालयास, उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्रपणे अभ्यागत कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर पोलीस दलामध्ये पोलीस मुख्यालयात अभ्यागत कक्ष आहे. पोलीस उपविभागीय कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्ये मात्र अभ्यागत कक्ष नाहीत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात केलेल्या कारवाईमध्ये महसूलपाठोपाठ दुसरा क्रमांक पोलीस दलाचा आहे. वर्षाला १२ पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहात सापडले आहेत. त्यामुळे पोलीस दलामध्ये लाचखोरांची संख्या वाढत असल्याने खाकी वर्दीची नाचक्की होऊ लागली आहे. पोलीस महासंचालक दीक्षित यापूर्वी ‘लाचलुचपत’चे महासंचालक होते. यावेळी त्यांनी शासकीय कार्यालयांत कारवाईचा धडाका लावून लाचखोरांना चांगलाच चाप लावला होता. आता मात्र त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांत अभ्यागत कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिल्याने लाचखोर कर्मचाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. (प्रतिनिधी) अशी असेल कारवाई पोलीस मुख्यालय किंवा पोलीस ठाण्यांत कामासाठी कोणी अधिकारी किंवा कर्मचारी लाच मागत असतील तर त्याची तक्रार नागरिकांनी अभ्यागत कक्ष अधिकाऱ्यांकडे द्यावी. या तक्रारीवर उपविभागीय अधिकारी चौकशी करून त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना पाठविणार आहेत. त्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल. पोलीस कर्मचारी वर्षाला लाच घेताना रंगेहात सापडले आहेत. त्यामुळे पोलीस दलामध्ये लाचखोरांची संख्या वाढत असल्याने खाकी वर्दीची नाचक्की होऊ लागली आहे.
लाचखोरी रोखण्यासाठी आता ‘अभ्यागत’ कक्ष
By admin | Published: February 20, 2016 12:38 AM