कोल्हापूर : पोलंडचे उपपंतप्रधान अॅँडरेज ड्युडा हे सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी राजशिष्टाचारानुसार त्यांचे यथोचित स्वागत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. खासदार संभाजीराजे यांनी याबाबत फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय घेतला.पोलिश राजदूतांसह संभाजीराजे, मालोजीराजे यांनी नुकतीच फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत फडणवीस यांनी या संदर्भात सकारात्मकता दाखवीत, कुठल्याही प्रकारची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. या संदर्भातील सूचना त्यांनी राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना दिल्या; तसेच महाराष्ट्र शासनासाठीसुद्धा ही गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.कोल्हापूरच्या छत्रपतींनी दुसऱ्या महायुद्धातील पोलिश निर्वासितांना आश्रय दिला होता. त्यांच्या ऋणात आजही पोलंडवासी आहेत. तत्कालीन भारतातील जामनगर आणि कोल्हापूर या दोनच संस्थानांनी या सर्वांना आश्रय दिला होता.
जामनगरमध्ये जवळपास ५०० विद्यार्थी शिक्षणासाठी गेले, तर कोल्हापूरमध्येही पाच हजार लोक कुटुंबासह राहण्यासाठी आले. त्यावेळी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने त्यांच्यासाठी वळिवडेच्या माळावर सुसज्ज वसाहत स्थापन करून शाळा, हॉस्पिटल, राहण्याची सोय करून चर्चही बांधून दिले होते.खासदार संभाजीराजेंच्या प्रयत्नांमुळे मागील काही वर्षांपासून या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पोलंडच्या राजदूतांनी कोल्हापूरला काही महिन्यांपूर्वी भेट दिली होती. येत्या सप्टेंबरमध्ये पोलंडचे प्रमुख नेते आणि २० मान्यवर कोल्हापूरला येणार आहेत.