कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी पार पडले. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शहर व ग्रामीण भागातील काही संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. मतदार प्रक्रिया संपेपर्यंत ते यंत्रणेकडून माहिती घेत होते. निवडणूक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंदोबस्तासाठी सुमारे साडेपाच हजार पोलिसांनी मेहनत घेतली.विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली होती. आचारसंहिता लागताच पोलीस प्रशासनाच्या आठ ते दहा बैठका बंदोबस्तासाठी घेण्यात आल्या. प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासह मातब्बर नेत्यांच्या सभा कोल्हापुरात झाल्या. या सभांना कोठेही गालबोट लागू दिले नाही.
दहा विधानसभा मतदारसंघांत पोलिसांचे सशस्त्र संचलन करून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. मतदान प्रक्रियेसाठी ओडिशा, कर्नाटक, मुंबई, दौंड, पुणे रेल्वे येथून ९०० पोलीस व १० केंद्रीय जवानांच्या कंपन्या दाखल झाल्या. संवेदनशील ७० केंद्रांवर हे जवान तैनात केले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर सकाळी भेट देऊन पाहणी केली. येथील बंदोबस्ताला असणाऱ्या जवानांना सूचनाही केल्या. त्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील काही संवेदनशील केंद्रांना भेटी दिल्या. दिवसभर ते वॉकीटॉकीवरून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत होते.शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास १० मतदारसंघांनुसार बंदोबस्ताचे वाटप करून तो रवाना केला होता. रविवार आणि सोमवार असे दिवस-रात्र सुमारे साडेपाच हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षकांसह उपअधीक्षकांच्या टीमने भेटी देऊन पाहणी केली. सकाळपासून मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. मतदान केंद्राच्या १०० व २०० मीटर परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू केला असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी होऊ दिली नव्हती.मतदान केंद्रांना सशस्त्र सुरक्षामतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गावागावांत बंदोबस्ताला असणारे पोलीस मतदान केंद्रावर सतर्क दिसत होते. मतदारांच्या रांगा लावण्यापासून त्यांना आतमध्ये सोडण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडत होते. चौकाचौकांत उमेदवारांचे कार्यकर्ते गर्दी करून होते. त्यांच्यात वादावादीचे प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस गर्दीच्या ठिकाणी फिरुन अंदाज घेत होते. पोलिसांचा फौजफाटा सतर्क असल्याने वादावादी करण्याचे धाडस कोणी केले नाही. मतपेट्या जमा करण्यापर्यंतची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांनी पार पाडली.