पट्टणकोडोली : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्याअनुषंगाने २९ डिसेंबरपासून गावनिहाय भेटी देऊन नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे यातून अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.
वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत खासदार धैर्यशील माने यांनी १० डिसेंबर राेजी चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प संघटनांतील पदाधिकारी व गौरव नायकवडी यांना सोबत घेऊन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याबरोबर बैठक घेतली होती. यामध्ये वसाहतींचे विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते. प्रत्येकी सोळा वसाहतींमध्ये समक्ष जाऊन प्रश्न सोडविण्याबाबत सांगितले होते. माने यांच्या या बैठकीनंतर आज जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष वसाहतींमध्ये जाण्यासाठी परिपत्रक काढले आहे. यामध्ये पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता, प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हातकणंगले, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांचे तहसीलदार यांचा समावेश असणार आहे.