कोल्हापूर : थकीत कर्ज भरले नसल्याच्या रागातून आरबीएल बँकेच्या महिला कर्मचाऱ्याने कर्जदारास फोनवरून ‘तुझ्या बायको-आईला विक परंतु आमचे पैसे आणून भागव अशी उद्दाम भाषा वापरल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. संबंधित महिला कर्मचा-याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संशयित सुप्रिया पाठक (मुंबई) आणि शीतल (पूर्ण नाव समजले नाही) अशी त्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटले तरी संशयितांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
येथील सराफ व्यावसायिक श्रेयस संजय पोतदार (वय ३२, रा. बेलबाग, मंगळवार पेठ) यांनी आरबीएल बँकेकडून दीड वर्षापूर्वी क्रेडिट कार्ड घेतले होते. कार्डाची व्यवहार क्षमता १ लाख ८९ हजार रुपये होती. कार्डावर त्यांची रक्कम १ लाख २२ हजार रुपये थकीत असल्याने ती तातडीने बँकेत भरावी, यासाठी बँकेच्या कर्मचाºयांनी तगादा लावला होता. बँकेच्या गोरेगाव ईस्ट (मुंबई) शाखेतील रिकव्हरी विभागातील सुप्रिया पाठक यांनी दि. २४ ते २७ एप्रिलदरम्यान पोतदार यांच्या मोबाईलवर फोन करून थकीत रक्कम भरण्यासाठी दमदाटी केली. याशिवाय पोतदार यांची पत्नी, आई आणि मित्रालाही फोन केला. पैसे भरले नाहीत तर बदनामी करण्याची धमकीही दिली. पोतदार यांनी २७ एप्रिलला राजारामपुरीतील बँकेच्या शाखेत कर्मचारी पृथ्वीराज देसाई यांच्याकडे २५ हजार रुपये भरले.
पोतदार यांनी पावती मागितली; मात्र देसाई यांनी पावती दिली नाही. त्यावर पाठक यांना फोन करून पावतीची मागणी केली. त्यावेळी बँकेतील महिला कर्मचा-याने श्रेयस यांना खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली. या महिला कर्मचारी कर्जदारास अगोदर तुझ्या बायकोच्या अंगावरील दागिणे विकून पैसे आणून दे असे सूचवतात. संभाषण पुढे वाढल्यावर त्या एकदम एकेरी भाषेत येवून तू बायको आणि आईच्या मागे काळे तोंड करून लपतोस कशाला, त्यांनाच विक आणि आमचे पैसे आणून भागव असेही सुचवतात. कर्जदाराच्या पत्नीबद्दलही त्या अश्लिल भाषा वापरत असल्याचे आॅडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. ही क्लिप पोतदार यांनी जुना राजवाडा पोलिसांनाही दिली आहे. या प्रकरणी २५ मे रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पोतदार यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
बँकेकडून निषेधदरम्यान बँकेने या घटनेचा निषेध केला आहे. बँक अशा भाषेचे कधीही समर्थन करणार नाही. घडलेल्या प्रकाराची चौकशी करून त्यात कोण दोषी आढळले तर बँक नक्की कारवाई करेल. याप्रकरणी पोलीस चौकशीसही बँक सहकार्य करेल. पोतदार हे बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांच्याकडील वसुलीची प्रक्रियाही सुरुच राहील, असे बँकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.थकीत कर्ज भरले नसल्याच्या रागातून आरबीएल बँकेच्या महिला कर्मचाºयाने कर्जदारास फोनवरून अश्लील भाषा वापरल्याने गुन्हा दाखल झाला आहे. संशयित सुप्रिया पाठक (मुंबई) आणि शीतल या दोघींवर कारवाई करणार आहे. -अनिल गुजर, पोलीस निरीक्षक,जुना राजवाडा पोलीस ठाणे