सांगली : राष्ट्रवादीची फुटलेली मते, स्वाभिमानी आघाडीच्या आठ नगरसेवकांची मिळालेली साथ आणि भाजप सदस्यांनी घेतलेली तटस्थ भूमिका यांच्या जोरावर आज, शनिवारी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत सत्ताधारी कॉँग्रेसने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक विक्रमी मतांनी जिंकली. कॉँग्रेसचे संख्याबळ ४२ असताना महापौरपदी मिरजेचे विवेक कांबळे, तर उपमहापौरपदी कुपवाडचे प्रशांत पाटील तब्बल ५० मतांनी निवडून आले. महापौर निवडीच्या निमित्ताने स्वाभिमानी आघाडीत फूट पडली असून, राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी तटस्थ व गैरहजर राहण्याची भूमिका स्वीकारल्याने कॉँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर बनला.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदावर सध्या मागासवर्गीय आरक्षण आहे. पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिले दीड वर्ष कांचन कांबळे यांनी हे पद सांभाळले. आता आरक्षणाचा एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी सत्ताधारी गटांतर्गत प्रचंड स्पर्धा निर्माण झाली होती. मिरजेचे कॉँग्रेसचे नगरसेवक इद्रिस नायकवडी यांनी केलेल्या राजकीय खेळीमुळे महापौर, उपमहापौर निवडीत चुरस व पक्षांतर्गत संघर्ष निर्माण झाला होता. नायकवडी यांनी उपमहापौरपदासाठी वंदना कदम यांचे नाव पुढे आणले. त्यांना अर्जही भरायला लावला होता. महापौरपदासाठी कॉँग्रेसकडून विवेक कांबळे, राष्ट्रवादीकडून शेडजी मोहिते आणि स्वाभिमानी आघाडीतर्फे बाळासाहेब गोंधळी यांनी अर्ज दाखल केले होते. उपमहापौरपदासाठी कॉँग्रेसचे प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे राजू गवळी, स्वाभिमानीचे शिवराज बोळाज आणि कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवार वंदना कदम रिंगणात होते. महापालिकेच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सभेच्या सुरुवातीला अर्जांची छाननी करून अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. या कालावधित महापौरपदासाठीचा स्वाभिमानी आघाडीचे बाळासाहेब गोंधळी यांचा अर्ज मागे घेण्यात आला. कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवार वंदना कदम आणि स्वाभिमानीचे शिवराज बोळाज यांनीही उपमहापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे झालेल्या महापौरपदाच्या दुरंगी लढतीत विवेक कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या शेडजी मोहिते यांचा, तर उपमहापौरपदाच्या लढतीत प्रशांत पाटील यांनी राजू गवळी यांचा प्रत्येकी २९ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे संख्याबळ २५ असताना त्यांच्या उमेद्वारांना केवळ २१ मते मिळाली. त्यांचे सहयोगी नगरसेवक धनपाल खोत, सुलोचना खोत यांनी तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली, तर अल्लाउद्दीन काझी, शुभांगी देवमाने या गैरहजर राहिल्या. दुसरीकडे भाजप वगळता स्वाभिमानी आघाडीच्या अन्य आठ सदस्यांनी कॉँग्रेसला उघडपणे मतदान केले. भाजपचे युवराज बावडेकर, स्वरदा केळकर, वैशाली कोरे, राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य असलेले धनपाल खोत, सुलोचना खोत अशा पाच सदस्यांनी तटस्थ राहणे पसंत केले. या सर्व घडामोडी कॉँग्रेसच्याच पथ्यावर पडल्या. यामुळे कॉँग्रेसला धक्का देण्याचा विरोधी पक्षांचा आणि कॉँग्रेसअंतर्गत नायकवडी गटाचा प्रयत्न धुळीस मिळाला. कोण कोणावर कारवाई करणारतटस्थ राहणारे राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य धनपाल खोत, सुलोचना खोत व गैरहजर राहणाऱ्या शुभांगी देवमाने, अल्लाउद्दीन काझी या नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे गटनेते सूर्यवंशी यांनी दिला. पक्षांतर्गत उमेदवार उभा करून मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्यात वाद निर्माण करू पाहणाऱ्या संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा कॉँग्रेसचे गटनेते जामदार यांनी दिला. त्यांचा रोख अतहर नायकवडी, शुभांगी कांबळे आणि वंदना कदम यांच्यावर होता.वर्षात आणखी दोन महापौरसत्ताधारी गटनेते किशोर जामदार यांनी वर्षभरात आणखी दोघांना महापौरपदाची संधी देण्यात येणार असल्याचे सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला. तसे झाले तर चार महिन्यांसाठी एकाला हे पद द्यावे लागेल आणि पुन्हा कारभाराचा खेळ होण्यास वेळ लागणार नाही, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.
सर्वपक्षीय सहकार्याने महापौरपदी विवेक कांबळे
By admin | Published: February 01, 2015 12:48 AM