विक्रम पाटील ।करंजफेण : जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून लाऊडस्पीकर वाटप करण्यात आले होते. परंतु काही मोजक्या ग्रामपंचायती वगळता अनेक ग्रामपंचायतींनी या संकल्पनेला नव्याचे नऊ दिवस वाजवत ठेऊन साहित्याला इमारतींच्या अडगळीतील जागेमध्ये भंगाराचा रस्ता दाखविला असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी लोकांना सकाळच्या प्रहरी जनावरांची धार काढण्यापासून ते वैरण गोळा करण्यापर्यंतच्या लगबगीमध्ये तसेच शेतामध्ये काम करत असताना माहिती प्रसारणाद्वारे भक्तिगीतांच्या माध्यमातून सुप्रभात मंगलमय होण्याबरोबर प्रादेशिक बातम्या, शेतीविषयक माहिती, रोजचे शेतीमालाचे बाजारभाव, रोजचे पंचांग, व्याख्याने तसेच इतर निवडक माहितीसह हातामधील काम करता करता माहितीचा खजाना लोकांच्या कानी पडावा व ग्रामीण लोकांच्या विचारामध्ये अधिक भर व्हावी या उदात्त हेतूने गावोगावी संस्कारवाहिनी संच बहाल करण्यात आले होते.या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आवाजाच्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकरी गीतांच्या तालावर गाणी वाजवून घरफाळा वसुली, पाणीपट्टी वसुली अशाप्रकारे ग्रामपंचायतीच्या अर्थकारणातील महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी उपयोग होत असल्याचे आपल्याला दिसून येत होते.
तसेच गल्लोगल्ली आरोळी देत परंपरागत चालत आलेली दवंडी पद्धत काळानुरूप लोप पावल्यामुळे संस्कारवाहिनीच्या माध्यमातून स्पीकरवरून एकाचवेळी सूचना अगर शासनाच्या अनेक योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी या वाहिनीचा प्रामुख्याने मोठा फायदा होत होता. परंतु हे शासनाने दिलेले लाखोंचे साहित्य कित्येक ग्रामपंचायतींनी अनेक वर्षांपासून दुरूस्तीविना भंगारात टाकले आहे, तर मोजक्याचं ग्रामपंचायती याचा नियमित वापर करून लोकांना लाभ देत आहेत. तर अनेक ग्रामपंचायती याचा वापर स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनादिवशीच करून साहित्य जैसे थे गुंडाळून ठेवत आहेत.
त्यामुळे शासनाची योजना जरी चांगली असली तरी अनेक पंचायतींनी तिचा अमल योग्य प्रकारे केला नसल्यामुळे त्यामध्ये बिघाड झालेला दुरूस्ती करण्याची तस्ती देखील अनेक ग्रामपंचायतीने घेतलेली नाही. शेकडो ग्रामपंचायतींचे लाखोंचे सामान भंगारात पडले असल्याने संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष करून योजना पुनरुज्जीवित न केल्यास वापराविना साहित्य गायब होण्याची भीती व्यक्त होत आहे.
संस्कारवाहिनीच्या भोंग्यांद्वारे प्रसन्न वातावरण तयार होत असून, कामाच्या धावपळीतसुद्धा रेडीओतून दिली जाणारी वेगवेगळी माहिती व ग्रामपंचायतमधून सरकारी योजनांची पुकारलेली माहिती मिळण्यास मदत होते. त्यामुळे गावोगावी बंद असलेल्या या वाहिन्या तातडीने सुरू व्हाव्यात.- सरदार पाटील, तिरपण, ग्रामस्थ