तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महानगरपालिकेच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकातील प्रत्येक प्रभागावर विकासकामांसाठी दिलेले ऐच्छिक अंदाजपत्रक प्रथमच पहिल्या महिन्यात खर्च पडणार आहे. नगरसेवकाने आपापल्या प्रभागातील रस्ते पॅचवर्क आणि विविध विकासकामांचे इस्टिमेट जून अखेरपर्यंत देण्याबाबतचे पत्र आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सर्व नगरसेवकांना गुरुवारी दिले. त्यामुळे पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी रस्ते वगळता इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. दरवर्षी हाच ऐच्छिक निधी आठ-नऊ महिन्यांनंतर खर्च पडतो. अनेक वेळा तो खर्च न पडताच मार्च महिना नजीक आल्याने कागदावरच राहतो. त्यावेळी नगरसेवकांची ओरड होते; पण आता ही ओरड न होता हा विकासात्मक पायंडा ठरणार आहे. पहिल्या महिन्यात हा ऐच्छिक निधी खर्ची पाडण्याची महापालिकेच्या इतिहासातील प्रथमच घटना होय.यंदाच्या अंदाजपत्रकातील पहिल्या टप्प्यात ऐच्छिक अंदाजपत्रक वेळेत खर्ची पाडले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित वेळेत इतर विभागांचेही अंदाजपत्रक नियोजनबद्धतेने खर्ची पाडण्यासाठीचा आराखडा आयुक्त डॉ. चौधरी यांनी तयार केला आहे. महानगरपालिकेत अंदाजपत्रक मोठ्या दिमाखात सादर केले जाते; पण त्यातील अनेक निधी खर्ची पडत नाहीत. मुळात अंदाजपत्रक सादरीकरण झाल्यानंतर त्याच्या फाईल्स वेगवेगळ्या विभागांत आठ-नऊ महिने फिरत राहतात. त्यानंतर अंदाजपत्रक खर्च पडत नसल्याची ओरड नगरसेवकांकडून होते. अखेर मार्च महिना नजीक आला की ओढून-ताणून इस्टिमेट तयार करून अंदाजपत्रकीय खर्च पाडण्यासाठी हालचाली केल्या जातात. यावेळी वेळेत फाईल्स पुढे सरकल्या नाहीत म्हणून प्रशासनाला धारेवर धरले जाते. अशा पद्धतीने कोणताही निधी परत गेला म्हणून प्रशासनावर ठपका पडता कामा नये यासाठी आयुक्त डॉ. चौधरी यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत. यामुळे वेळेत अंदाजपत्रक खर्ची पडून विकासात्मक पायंडा पडणार आहे.पहिल्या टप्प्यात म्हणून अंदाजपत्रकातील ऐच्छिक निधी वेळेत खर्ची पाडण्यासाठी आयुक्तांनी नियोजन केले असून, त्यानुसार प्रभागातील कामांचे इस्टिमेट जूनअखेरपर्यंत प्रशासनाकडे सादर करण्याच्या लेखी सूचना आयुक्तांनी प्रत्येक नगरसेवकाला दिल्या आहेत. त्यानुसार पुढील महिन्यात कामांच्या निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्यापूर्वी रस्ते वगळता इतर कामे सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पावसाळ्यानंतर पॅचवर्कची कामे करण्यात येणार आहेत. अंदाजपत्रकातील अंदाजपत्रक वेळेत खर्ची पडावे, त्यामध्ये प्रशासनाकडून ढिलाई होऊ नये यासाठी आयुक्तांचे प्रयत्न आहेत. सत्ताधाऱ्यांना दहा, विरोधकांना सात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या ४८ नगरसेवकांना प्रभागात विकासकामांसाठी १० लाख, तर विरोधी ताराराणी-भाजप आघाडीच्या ३३ नगरसेवकांना कामांसाठी सात लाख रुपये निधी देण्यात आला आहे. या सर्व निधीपैकी प्रत्येकी अडीच लाख रुपये निधी हा रस्ते पॅचवर्कसाठी वापरणे बंधनकारक आहे. याशिवाय उपनगरांतील ४० प्रभागांना अतिरिक्त दोन लाख रुपये निधी दिला आहे.आता प्रभागातील कामांचेही फोटो द्यावे लागणारअनेक प्रभागांत गटारी, चॅनेल चांगली असतानासुद्धा ऐच्छिक अंदाजपत्रक खर्ची पाडण्यासाठी चांगली गटारेही बदलली जातात; पण आता असा प्रकार थांबणार आहे.कारण नगरसेवकाने आता कोणत्या कामाचे इस्टिमेट आहे, त्याची सध्याची परिस्थिती व कामे पूर्ण केल्यानंतरची परिस्थिती याचे फोटो अगर व्हिडिओ चित्रण सादर करायचे आहे. त्यामुळे कोणत्याही कामात विनाकारण निधी खर्च पडणार नाही.
ऐच्छिक बजेट महिन्यातच खर्ची पडणार
By admin | Published: June 09, 2017 12:11 AM