कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. या महाविद्यालयाच्या रूग्णालयात बेकायदेशीरपणे गेली अनेक वर्षे कामगार भरती करणाऱ्या कंपनीला ठेका दिल्याने सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षित यांची स्वेच्छानिवृत्ती चर्चेचा विषय ठरली आहे.
दोन वर्षांपूर्वी डॉ. दीक्षित या पदावर रूजू झाले होते. या ठिकाणी चांगली शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दरम्यान गेल्यावर्षीपासून डी. एम. एंटरप्रायजेस या कामगार पुरवणाऱ्या कंपनीच्याविरोधात स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. जबरदस्त पाठपुरावा करत या प्रकरणी साडे सहा कोटी रूपयांचा अपहार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन न दिल्याचा प्रमुख आरोप आहे. येथील प्रशासकीय यंत्रणेने सातत्याने या कंपनीला मुदतवाढ देण्याची भूमिका घेतली.
दीक्षित यांच्या काळातही यातील मुदतवाढ दिली गेल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर दीक्षित यांनी काही महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला होता. पहिल्यांदा तो नाकारण्यात आला. त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विनंती केल्यानंतर तो सोमवारी मंजूर करण्यात आला आहे.