आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 : ‘आव्हान’ मधून प्रशिक्षित झालेल्या स्वयंसेवकांनी आपल्या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे केले.
‘आव्हान’मध्ये पुणे जिल्हा (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि सातारा जिल्हा (शिवाजी विद्यापीठ) उत्कृष्ट ठरले. त्यांना ‘बेस्ट कॉन्टिन्जेन्ट’ चषक देऊन गौरविण्यात आले. शिवाजी विद्यापीठात दहा दिवसीय ‘आव्हान’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील लोककला केंद्रातील कार्यक्रमास शाहू छत्रपती, महापौर हसिना फरास, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, ‘एनएसएस’ चे राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंखे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) निरीक्षक एस. डी. इंगळे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यात उदभवणाऱ्या विविध आपत्तीचा विचार करता जिल्हा पातळीवरील व्यवस्थापनाच्या तयारीला ‘चॅन्सलर्स ब्रिगेड’ ची चांगली जोड मिळाली आहे. आपत्तीमधील योग्य मदत ही प्रशिक्षणावर अवलंबून असते. या स्वरुपातील मदत करणे ही जिकरीचे आणि पुण्य याचे काम आहे. विकासाच्या नादात आपण आपत्तीकडे वाटचाल करीत आहोत. त्यामुळे शहर, गावांमध्ये आपत्ती उदभवत आहेत. या आपत्ती व्यवस्थापनात ‘आव्हान’मधील प्रशिक्षित स्वयंसेवकांनी आपल्या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रशिक्षित करावे.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या आपत्तीची शक्यता असते. त्यासाठी सध्या सर्व विभाग सज्ज आहेत. यावर्षी जिल्हा प्रशासनाने पूर येणारी गावे निश्चित केली आहे. या गावांतील २५ वर्षांवरील युवकांना व्हाईट आर्मी, जीवनज्योत संस्थांतर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ५० गावे पूर्ण झाली आहेत. आपत्तीमध्ये तातडीच्या मदतीसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
प्रशिक्षणासाठी ‘आव्हान’ महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. या कार्यक्रमात ‘आव्हान’मध्ये उत्कृष्ट विद्यापीठाचे विजेतेपद पटकविणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि उत्कृष्ट जिल्हा ठरलेला सातारा जिल्हा संघाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते फिरते चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाच्या ‘माध्यमविद्या’ अंकाचे प्रकाशन झाले. विद्यापीठाच्या ‘एनएसएस’ चे प्रभारी संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्वागत केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या एनएसएसने आपत्तीवेळी केलेल्या मदतीची माहिती दिली. नंदिनी पाटील, डॉ. तृप्ती करीकट्टे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
अन्य विजेते असे
जागृती रॅलीतील उत्कृष्ट सादरीकरण : मुंबई विद्यापीठ. उत्कृष्ट स्वयंसेवक : सामिका सावंत (बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली), हर्षा भट्ट, महेश बन (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक), कुणाल मानकर (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव). उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी : प्रा. अतुल अकोठोर (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर), प्रा. सारिका पेरणे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ).
या विजेत्यांना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आव्हान’ मध्ये राज्यातील १४ विद्यापीठांतून सहभागी झालेल्या १२०० स्वयंसेवकांच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेतून या विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्या संघांनी कार्यक्रमस्थळी यशाचा जयघोष करीत जल्लोष केला.