कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत सुरू केलेल्या मतदार जनजागृती अभियानामधील स्वीप अंतर्गत कोल्हापूर शहरातील गांधी मैदानावर आज, मंगळवारी सकाळी 10 हजार 495 विद्यार्थ्यांनी विक्रमी अशी मानवी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला.यावेळी शहरातील अडतीसहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवून जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील नवीन विक्रम नोंदविण्यात मोलाची भर घातली. ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचा “नॅशनल रेकॉर्ड” व “एशिया पॅसिफीक रेकॉर्ड” ची नोंद झाली. यावेळी मिळालेला सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षकांना समर्पित केला. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, देशस्तरावर नोंद झालेल्या या उपक्रमातून मतदारांना चांगला संदेश जाईल, यातून निश्चितच मतदान टक्केवारी वाढण्यास भर पडेल. या उपक्रमाला मनपा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरीक्त मनपा आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक तथा नोडल अधिकारी स्वीप नीलकंठ करे, ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ.महेश कदम, वर्षा परिट, धायगुडे उपस्थित होते.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्हयातील सर्वच मतदारांपर्यंत संदेश जाईल की आपण बाहेर पडून 7 मे रोजी मतदान केले पाहिजे. लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभागी होवून मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कोल्हापूर मनपाच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी कोल्हापूर जिल्हयातील मागील निवडणूकीच्या मतदान टक्केवारीत अधिक भर टाकत शंभर टक्के मतदानाजवळ जावू अशी आशा व्यक्त केली.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी लोकशाहीतील सर्वात मोठा सण असलेल्या निवडणूकीमधे नागरिकांनी आपला हक्क बजावला पाहिजे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आपल्या लोकशाहीची, निवडणूक प्रक्रियेची माहिती अशा उपक्रमातून आतापासूनच दिली जात असल्याचे सांगितले.यानंतर ग्लोबल रेकॉर्डस ॲण्ड रीसर्च फौडेशनचे निरीक्षक डॉ.महेश कदम यांनी चेन्नई शहरानंतर भारतात असा उपक्रम नोंदविला गेल्याची घोषणा केली. या विक्रमी नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह डॉ.कदम यांनी जिल्हधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले.
मतदार जनजागृती; कोल्हापूरात साडेदहा हजार विद्यार्थ्यांनी साकारली विक्रमी मानवी रांगोळी
By विश्वास पाटील | Published: March 19, 2024 3:40 PM