कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघांतील सर्व मतदान केंद्रावर मंगळवारी मतदार मदत कक्षाची केलेली व्यवस्था उपयोगी ठरली. दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा केंद्रावर उपलब्ध होत्या.दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय, अंध तथा दुर्बल मतदारांसोबत सहकाऱ्यास परवानगी, विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य, एश्ट यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधा, पुरुष व महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था, मतदान केंद्रांमध्ये प्रत्येक पुरुष मतदारामागे दोन महिला मतदारांना प्रवेश देण्याची सुविधा होती.
प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांची सुविधा, मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक, विकलांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर ये-जा करिता मोफत वाहतूक करण्यात आली होती. निवडक शाळांमध्ये विकलांग मतदारांसाठी साहाय्यकारी मतदान केंद्र, अंध मतदारांसाठी ब्रेल भाषेमध्ये मतदार ओळखपत्र,आदी सुविधा उपलब्ध होत्या. या सुविधांबद्दल मतदारांतून समाधान व्यक्त करण्यात येत होते.
अशी होती प्रक्रियाछायाचित्र मतदार पावती प्रत्येक मतदारास दिली होती. ही पावती मतदार हे मतदान केंद्रावर मतदार मदत केंद्रात दाखवून मतदान करावयाची कक्षाची माहिती घेत होते. कक्षात गेल्यानंतर सर्वप्रथम त्या मतदाराचे ओळखपत्र पाहून मतदार यादी पाहून खात्री केली जात होती. त्याची स्वाक्षरी घेण्यात येत होती. त्यानंतर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येत होती. शाई लावल्यानंतर मतदार हे मतदान करत होते. मतदान कक्षातील या प्रक्रियेला सरासरी दोन-तीन मिनिटे लागत होती.