कोल्हापूर : लोकशाही बळकट करणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्यास मिळाल्याबद्दल नव-युवा मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान केले, असे अनेक नवमतदारांनी ठामपणे सांगत सेल्फी काढत सोमवारी विधानसभेतील पहिल्या मतदानाचा दिवस यादगार केला.यंदा पहिल्यांदाच आपणास मतदानाचा हक्क मिळाला आहे आणि मतदान हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे जाणून या युवा मतदारांनी अत्यंत अभिमानाने मतदान प्रक्रियेत भाग घेत असल्याचेही सांगितले.आज मतदान केल्यानंतर कर्तव्यपूर्तीचा अभिमान वाटत आहे. माझ्या मैत्रिणींनीदेखील त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रावर मतदान केले. हा एक आनंदाचा क्षण वाटत आहे; त्यामुळे आम्ही सेलिब्रेटही करणार आहोत.- भक्ती वागळेप्रथमच मतदान करत असले तरी आजूबाजूला काय घडत आहे, याची मला पूर्णत: जाणीव आहे. महिलांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतीविषयक समस्या यांसारखे हे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहेत. ही परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने मतदानाच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रयत्न करत आहे.- स्नेहा रावळमाझे पहिले मतदान आहे. आपल्या मतदारसंघाचा व राज्याचा विकास करेल त्याच उमेदवाराला मी मतदान केले आहे. मी माझ्या मतदानाचा अधिकार प्रामाणिकपणे पार पाडला आहे.- श्रद्धा जाधवमतदानाबाबत लहानपणापासून उत्सुकता होती. यावेळी पहिल्यांदा मतदान करून छान वाटले. शिक्षण झाल्यानंतर लगेच नोकरी लागावी, हीच आमची अपेक्षा आहे.- मीरा सुगंधीयुवकांचे शैक्षणिक प्रश्न सोडविणारा व रोजगार निर्माण करून देणाऱ्या उमेदवाराला मी मतदान केले आहे. पहिल्यांदाच मतदानासाठी केंद्रावर जाताना दडपण आले होते.- काजोल सातर्डेकर