कोल्हापूर : सर्व पक्षांच्या नेत्यांच्या राबणुकीला मतदारांनी न्याय दिल्याचे प्रातिनिधिक चित्र जिल्हा परिषदेच्या निकालानंतर समोर आले आहे. त्यातही शिवसेना आणि भाजपने जाणीवपूर्वक केलेले नियोजन यशस्वी झाल्याचे एकूण विजयी सदस्यांची संख्या पाहता दिसून येते. गेल्यावेळी ३० सदस्यांच्या बळावर जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’ला सोबत घेऊन सत्ता संसार करणाऱ्या काँग्रेसच्या विजयासाठी यावेळीही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहे. पी. एन. यांच्या चिरंजीवाचा विवाह याचदरम्यान आल्याने त्यांना जिल्हाभर फिरता आले नाही. त्यामुळे त्यांनी नंतर ‘करवीर’वर लक्ष केंद्रित केले. मात्र, सतेज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून उमेदवारी देण्यापासून ते प्रचारसभा घेण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडली. मात्र, काँग्रेसचे दोन नेते जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे यांच्यातील वाद मिटवता आला नाही. काँग्रेसचे बहुतांशी उमेदवार या दोघांना मानणारे आहेत.राष्ट्रवादीच्या निवडणुकीची धुरा प्रामुख्याने आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यावर होती. माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी काही ठिकाणी भाजपच्या ‘सोयीची भूमिका’ घेतली असतानाही आणि प्रतिकूल वातावरण जाणवत होते. मात्र, टप्प्या-टप्प्याने अनेकजण राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानेही मुश्रीफ हे जिल्हाभर काम करू शकले नाहीत हे वास्तव आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच अडकून पडावे लागले. महसूलमंत्री भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांनी जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीला सोबत घेत चांगली आखणी केली होती. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार अमल महाडिक, संघटनमंत्री बाबा देसाई यांच्यावर ‘दादां’नी जबाबदारी टाकून ते सांगली आणि साताऱ्याच्या प्रचारासाठीही फिरत होते. ‘भाजता’ची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, नंतर अनेक जागांवर पर्याय नसल्याने भाजपला मिळतील ते उमेदवार उभे करावे लागले तरीही भाजपने काँग्रेसच्या बरोबरीने जागा मिळविल्या. भाजपच्या सामूहिक प्रयत्नांचेच हे यश आहे. मावळत्या सभागृहात भाजपचे ३ उमेदवार होते. तेथून १४ पर्यंतची भाजपने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. दुसरीकडे शिवसेनेला फारसे कुणी गांभीर्याने घेत नसल्याचे प्रारंभी चित्र होते. मात्र, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांनी अतिशय शांतपणे, फारसा गाजावाजा न करता नियोजन केले होते. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्या प्रयत्नांना यश येत शिवसेना सहा जागांवरून या सभागृहात दहा जागांवर पोहोचली. मुंबई महापालिकेच्या संघर्षामुळे शिवसेना आणि भाजप हे समीकरण आधी जमले नाही. मात्र, अशी युती झाली असती तर या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असते.काँग्रेसतर्फे सतेज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचाराची धुरा सांभाळली राष्ट्रवादीच्या निवडणुकीची धुरा प्रामुख्याने आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यावर होती.चंद्रकांतदादा पाटील यांनी जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीला सोबत घेत चांगली आखणी केली होती. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांनी अतिशय शांतपणे, फारसा गाजावाजा न करता नियोजन केले होते.
नेत्यांच्या राबणुकीला मतदारांनी दिला न्याय
By admin | Published: February 24, 2017 12:41 AM