लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींमधील ३ हजार ३०७ गावकारभारी निवडण्यासाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून ७ हजार ६५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १ हजार ५५३ केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी (दि. १८) मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ४३३ ग्रामपंचायतींसाठी सध्या निवडणूक लागली आहे. यापैकी ४७ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी झाल्याने आता ३८६ ग्रामपंचायतींसाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे. अत्यंत चुरशीने होणाऱ्या या निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गावा-गावातील राजकारणात खलबते सुुरू होती. उमेदवार व कार्यकर्ते रात्री जागत मतांसाठीच्या जोडण्या करत होते. अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सगळ्यांची धडपड असणार आहे. गावा-गावात सकाळच्या टप्प्यात अधिकाधिक मतदान होण्याची शक्यता आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. यानंतर निवडणुकीची धामधूम थांबणार असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. दोन दिवसांच्या अंतरानंतर सोमवारी मतमोजणी होणार आहे.
-----------
अशी आहे निवडणूक...
ग्रामपंचायती : ३८६
प्रभाग : एकूण प्रभाग : १ हजार ४९१ ,
निवडणूक लागलेले : १ हजार ३४५
सदस्य : एकूण सदस्य : ४ हजार २७ ,
निवडून येणारे सदस्य : ३ हजार ३०७
--
एकूण उमेदवार : ७ हजार ६५७
महिला उमेदवार : ३ हजार ७०१
मतदान केंद्रे : १ हजार ५५३
--
एकूण मतदार : ९.२९ लाख
पुरुष मतदार : ४ लाख ७८ हजार ४९४
महिला मतदार : ४ लाख ५१ हजार ३७६
इतर : ८
--
निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायती (तालुकानिहाय)
शाहुवाडी : ३२
पन्हाळा : ३९
हातकणंगले : २०
शिरोळ : ३३
करवीर :५०
गगनबावडा : ८
राधानगरी : १७
कागल : ४८
भुदरगड : ४१
आजरा : २१
गडहिंग्लज : ४४
चंदगड : ३३
--
बिनविरोध गावे : ४७
बिनविरोध प्रभाग : १४६
बिनविरोध सदस्य : ७२०
----
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार आहे. मतदानाला येताना नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक असून रांगांमधील दोन व्यक्तींमध्ये दोन फुटाचे अंतर राखण्यात येणार आहे. थर्मल गनद्वारे मतदारांचे तापमान माेजून त्यांना आत प्रवेश दिला जाणार आहे.
---
संवेदनशील गावे : १११
करवीर : १५, कागल : ८, हातकणंगले : ९, गडहिंग्लज : २१, शाहुवाडी : १६, भुदरगड : १० , चंदगड : ५, राधानगरी : ६, गगनबावडा : ३, शिरोळ : ४, पन्हाळा : १४
---
पोलीस बंदोबस्त
निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकारी, कर्मचारी असा ३ हजार ८०६ जणांचा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार, गृहरक्षक दलाचे जवान व एसआरपीएफ यांचा समावेश आहे.
--