भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या, रविवारी मतदान होत आहे. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून ८२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी ७२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी दिली.‘भोगावती’च्या २५ जागांसाठी गेली १५ दिवस राधानगरी, करवीर तालुक्यात सभांचा अक्षरशा धुरळा उडाला आहे. ऐन दिवाळीत आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले होते. आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार संपतराव पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी, कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, भाजपचे हंबीरराव पाटील आदींच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडी व कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. मतदान उद्या, रविवारी हाेत असून मतमोजणी सोमवारी, रमणमळा येथील शासकीय गोदामात होणार आहे.
दृष्टिक्षेपात ‘भोगावती’ निवडणूक
- सत्ता : आमदार पी. एन. पाटील
- कार्यक्षेत्र : करवीर व राधानगरी तालुक्यातील ५८ गावे
- उत्पादक सभासद : २७ हजार १६५
- संस्था सभासद : ४९५
- लढत : तिरंगी
- जागा : २५
- उमेदवार : ८१
- मतदान : रविवारी
- मतदान केंद्रे : ८२
- कर्मचारी : ७२०