मोहिते हे अत्याळ येथील विठ्ठल सहकारी दूध संस्थेचे विद्यमान संचालक होते. त्यांच्या नावावर गोकुळचा ठराव होता. दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे आठ दिवसांपासून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वासोच्छवासाला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
रविवारी, येथील एम. आर. हायस्कूलवर 'गोकुळ'साठी मतदान झाले. दुपारी ४ नंतर कोरोनाबाधितांना पीपीई कीट परिधान करून मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार कोरोनाबाधित ५ ठरावधारकांनी मतदान केले. त्यात मोहिते यांचाही समावेश होता. मतदानानंतर रात्री उशिरा मोहिते यांचा मृत्यू झाला.
त्यांनी गडहिंग्लज शहर गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष, शिवाजी बँकेचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष, तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना-नातवंडे, ३ भाऊ व बहीण असा परिवार आहे.
चौकट :
व्हेंटिलेटरवर असतानाही मतदान...
व्हेंटिलेटरवर असतानाही मोहिते यांनी मतदान कसे केले ? याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मोहिते हे व्हेंटिलेटरवर होते, सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले आहे.