आजरा : आजरा तालुक्यात सात ग्रामपंचायतींकरिता सरासरी ८४.९१ टक्के मतदान झाले असून, मुमेवाडी येथे सर्वांत जास्त ९२.४१ टक्के, तर महागोंड येथे ७४.४६ टक्के सर्वांत कमी मतदान झाले. निंगुडगे, सरोळी येथे किरकोळ बाचाबाचीचे प्रकार घडले.बुधवारी सकाळच्या पहिल्या टप्प्यात दहा वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले. दुपारनंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. निंगुडगे येथे ८६.४८ टक्के, हत्तीवडे येथे ८३.१३ टक्के, सरोळीत ९१.३६ टक्के, तर सुळे येथे ८०.७८ टक्के मतदान झाले.सरोळी येथे मतदान केंद्रावर प्रवेश मिळविण्याच्या कारणावरून बाचाबाची झाल्याने सुमारे अर्धा तास वातावरण तंग झाले होते. किणे येथे मात्र पोलिसांनी खबरदारी घेत नेतेमंडळींना मतदान केंद्रापासून दूर ठेवण्याची दक्षता घेतली होती. मुमेवाडी : (ता. आजरा) येथे तीन प्रभागांतून नऊ जागांसाठी मतदान झाले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. एकूण १४५० मतदारांपैकी १३४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ९२ टक्के मतदान झाले. पोलीस निरीक्षक संतोष बडे, सहायक फौजदार संजय चव्हाण यांनी बंदोबस्त ठेवला. महागोंड (ता. आजरा) येथे चार जागा बिनविरोध झाल्याने तीन जागांसाठी मतदान झाले. येथे सरासरी ७४ टक्के मतदान झाले. तुकाराम महादेव गुरव, सुलोचना महादेव गुरव, संजय शामराव माळवकर, निर्मला अमृत कांबळे या चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ८९.१४ टक्के मतदान झाले. मोहिते गट व चव्हाण गटाचे प्रत्येकी सहा सदस्य, असे काठावरचे बहुमत असल्याने या एका जागेसाठी इर्षेने मतदान झाले. सरपंच वैभवी शिंदे यांचे सरपंचपदासह सदस्यत्व गेल्याने रिक्त झालेल्या सर्वसाधारण महिलेच्या एका जागेसाठी मतदान झाले.गांधीनगर : गांधीनगर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणुकीसाठी ५५ टक्के मतदान शांततेत पार पडले. एकूण १३४० पैकी ७३६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. ( प्रतिनिधी )
ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान
By admin | Published: April 22, 2015 11:24 PM