कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेसाठी (कोजिमाशि) चुरशीने ९०.५३ टक्के मतदान झाले. दोन्ही आघाड्यांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनासह घोषणाबाजी केल्याने मतदान केंद्राबाहेर दिवसभर तणावाचे वातावरण होते. सोमवारी सकाळी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, चुरशीमुळे एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले.‘कोजिमाशि’ पतसंस्थेसाठी सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडी व राजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडी यांच्यात लढत झाली. एकास एक लढत असल्याने सुरुवातीपासून निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. पतसंस्थेच्या कारभारासह एकमेकांवर टोकदार टीका केल्याने शिक्षणक्षेत्रातील वातावरण चांगले गरम झाले होते. रविवारी न्यू हायस्कूल, पेटाळा येथे अत्यंत चुरशीने मतदान झाले. सकाळी आठपासूनच दोन्ही बाजूंनी मतदानासाठी ईर्षा दिसत होती. दहा वाजल्यापासून चंदगड, आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यांतील मतदार गाड्यांनी एकत्रित आणले जात होते. दहापर्यंत २०.१३ टक्के मतदान झाले. त्यानंतर एकदम गर्दी उसळली. मतदान केंद्रावर रांगा लागल्या. मोठ्या शाळांतील एकगठ्ठा मतदार आणून दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे दुपारी बारापर्यंतच ५२.८५ टक्के मतदान झाले. दिवसभर मतदानासाठी गर्दी राहिली. दुपारी चारपर्यंत तब्बल ८५ टक्के मतदान झाले, तर सायंकाळी पाचपर्यंत ७४७६ पैकी ६४७७ (९०.५३ टक्के) मतदान झाले. दरम्यान, आज, सोमवारी सकाळी आठपासून बाजार समितीमधील मल्टिपर्पज हॉलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. साधारणत: दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
‘कोजिमाशि’साठी शक्तिप्रदर्शनाने मतदान
By admin | Published: April 20, 2015 12:21 AM