कोल्हापूर : लोकशाहीसाठी मतदार साक्षरता गरजेची असून मतदान करणं ही सुध्दा देशसेवाच आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी येथे केले. लोकशाही वृध्दींगत होण्यासाठी नवमतदारांनी मतदानात नेहमीच उत्साह ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.राजर्षी शाहू स्मारक भवनात जिल्हा निवडणूक विभागातर्फे दहाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थिती महपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपजिल्हानिवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर आदींची होती. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा संदेश दाखवण्यात आला.कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, आम्ही भारतीय अशी ओळख आपल्या सर्वांना संविधानाने दिली आहे. संविधान हे धर्मग्रंथ आणि तिरंगा हा धर्मध्वज अबाधित ठेवण्याचे काम लोकशाही करत आहे. मतदान हे आपले कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाकडे दुर्लक्ष होता कामा नये. मतदान हा राष्ट्रीय सण म्हणून पहावा.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, चांगले पुढारी निवडायचे असतील तर आपणही प्रामाणिक रहायला हवे. आताचे समाजाचे चित्र बदलणार नाही तोपर्यंत नेतृत्व बदलणार नाही.डॉ. कलशेट्टी यांनी शंभर टक्के मतदान झालं पाहीजे असा आज आपण निर्धार करु व त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करु असे आवाहन केले. शाहीर आझाद नायकवडी यांनी गायनातून संविधानाची उद्देशिका आणि मतदार जनजागृती पोवाडा सादर केला.उपजिल्हा निवडणूक अधिकारी धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रांताधिकारी नावडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला निवडणूक तहसिलदार अर्चना शेटे, तहसिलदार सुनिता नेर्लीकर, नायब तहसिलदार अर्चना कुलकर्णी, रुपाली सुर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयांचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी, स्काऊट गाईड पथकाचे विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.दिव्यांग मतदारांचा जागेवर जाऊन सन्मानप्रमुख पाहुणे कुलगुरु डॉ. शिंदे यांच्या यांनी ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार यांचा जागेवर जाऊन सन्मान केला. नवमतदारांना मतदान ओळखपत्र प्रदान करण्यात आले. चित्रकला स्पधेर्तील मुकबधिर, दिव्यांग, स्पर्धकांना, अंध ब्रेल लिखाण स्पधेर्तील स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, पथनाट्य कलाकार, उत्कृष्ट कर्मचारी या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.