कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व १२ ग्रामपंचायतींसाठीच्या पोट निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. यासाठीची जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी लगेच मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी १ हजार ५४० उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहेत.जिल्ह्यातील डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठीची सार्वत्रिक निवडणूक व काही कारणाने ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या पदांसाठीची पोटनिवडणूक रविवारी होत आहे. जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी १ हजार ३८२, सरपंच पदासाठी १९२ व पोटनिवडणुकीसाठी ६६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. सोमवारी मतमोजणी होईल.
जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायती बिनविरोधजिह्यातील १५ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडी झाल्या आहेत. यात चांदेवाडी (आजरा), केकतवाडी, निटवडे, (करवीर) बुझवडे,आंबेवाडी, मिरवेल (चंदगड), माळवाडी (पन्हाळा), निष्णपहणबरवाडी, चांदमवाडी (भुदरगड), राणवाडी, चक्रेश्वरवाडी, मालवे (राधानगरी), ऐनवाडी, गावडी (शाहुवाडी) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
खर्च वेळेत सादर करानिवडणूक लढविलेल्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकाल घोषित केलेल्या दिवसापासून ३० दिवसात निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे गरजेचे आहे. खर्च सादर करण्यासाठी ट्रु वोटर ॲप वापरणे बंधनकारक असून तांत्रिक अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले आहे.