लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या मतदार याद्यांची कट ऑफ डेट पूर्वीप्रमाणेच राहणार असून, जुन्याच याद्या ग्राह्य मानण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिला. ‘गोकुळ’ व केडीसीसी बँकेसाठी ठराव गोळा केलेल्या इच्छुकांचा जीव अखेर भांड्यात पडला.
कर्जमाफी व त्यानंतर कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभर लांबणीवर टाकण्यात आल्या. शासनाने आता निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. मात्र निवडणुका लांबल्याने मतदार याद्यांची कट ऑफ डेट हा कळीचा मुद्दा बनला होता. कट ऑफ डेट २०१८ ग्राह्य धरण्यात येऊन नव्याने ठराव मागविण्यात यावेत, साठी मराठवाड्यातील बीड, परभणी व नांदेड जिल्हा बँकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली होती. जुन्वर मतदरी जुन्या मतदार यादीनुसारच मतदान होईल, यापूर्वी सादर केलेल्या याद्याच ग्राह्य मानण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे समजते.
या निकालाचा परिणाम ‘गोकुळ’, जिल्हा बँकेसह सर्वच सहकारी संस्थांच्या मतदार याद्यांवर होणार असल्याने सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
थकबाकीदार सभासदांबाबतही जुन्याच याद्या ग्राह्य धरल्याने त्यावेळी जे सभासद थकबाकीदार होते, ते अपात्रच राहणार आहेत. त्यामुळे थकबाकीचाही मुद्दा आपोआपच मागे पडल्याचे समजते.