कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त नर्थना स्कूल आॅफ डान्सच्या नृत्यांगणांनी भरतनाट्यम्द्वारे करवीरनिवासिनी अंबाबाईला वंदन करून नृत्यसेवा अर्पण केली.सकाळी ११ वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. नृत्यगुरू कविता मनोज नायर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेया गिरीश कामत, सिद्धी उमेश प्रभू, शच्ची धैर्यशील माने, गायत्री बिपीनचंद्र जिरगे, स्वराली आशिष कडू, कामाक्षी सचिन शानभाग यांनी भरतनाट्यम्द्वारे विविध नृत्याविष्कार सादर केले.
यामध्ये गजवंदना नृत्य, श्रीगपुरा दिश्वरी, रंजिनी, अष्टलक्ष्मी स्तुती नृत्य, धनश्री तील्लाना नृत्य, आईगिरी नंदीनी अशी नृत्ये सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. सुमारे दीड तास सुरू असलेला हा नृत्याविष्कार पाहण्यासाठी गर्दी झाली होती.या नृत्यांगणा मेडिकल, आर्किटेक्चर, इंजिनिअर अशा विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यातील वेळ काढून त्या भरतनाट्यम्चा सराव करीत आहेत. आजच्या मोबाईल व इंटरनेटच्या जगात दैनंदिन व्यवहार सांभाळून लोप पावत चाललेली ही नृत्यकला जोपासण्याचे काम केले आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह नृत्यांगणांचे पालक व भाविक उपस्थित होते.