कोल्हापूर : साहित्यिक वि. स. खांडेकर तथा भाऊंचे साहित्य हे अजरामर आहे. जीवनाकडे बघण्याचा लैलित्यापूर्ण दृष्टिकोन त्यांच्या लेखांतून दिसून येतो. त्यांची ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने शिवाजी विद्यापीठ काम करेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी केले.
साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या १२३व्या जयंती दिनी विद्यापीठातील वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. ललितबंध सारांशरूपाने खांडेकर साहित्यबद्दलची माहिती विद्यापीठाच्या ई-मीडियावरून देऊन, भाऊंच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यास विद्यापीठ कटिबद्ध आहे, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, नंदकुमार मोरे, उदयसिंह राजेयादव आदी उपस्थित होते.
चौकट
युवापिढीसाठी मोबाइल ॲप
खांडेकर भाऊंचे साहित्य युवापिढीपर्यंत मोबाइल ॲप, अन्य साधनांद्वारे पोहोचविण्याचे काम विद्यापीठाच्या वतीने केले जाईल. विविध ख्यातनाम साहित्यिकांच्या मुलाखती आणि त्यांचे मौलिक विचार अधिकाधिक व्यक्तीपर्यंत कसे पोहोचवता येतील, या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहील, असे प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले.
फोटो (११०१२०२१-कोल- खांडेकर जयंती) : कोल्हापुरात सोमवारी शिवाजी विद्यापीठात साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी अभिवादन केले. यावेळी शेजारी नीलांबरी जगताप, पी. एस. पाटील, उदयसिंह राजेयादव आदी उपस्थित होते.