गडहिंग्लज : वडरगे येथे विभक्त राहण्यासाठी वाटणी देत नसल्याच्या कारणातून विळा घेऊन चुलत्याच्या अंगावर धावून गेलेल्या दिराच्या हल्ल्यातून चुलत सासऱ्याला वाचविताना विवाहितेचा दुर्दैवी अंत झाला. मंगल मधुकर पोटे (वय ४५) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी श्रावण चन्नाप्पा पोटे (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वडरगे येथील आप्पा निंगाप्पा पोटे (८०) व चन्नाप्पा निंगाप्पा पोटे (७७) हे सख्खेभाऊ एकत्र राहतात. त्यांचे मृत भाऊ यल्लाप्पा यांचे कुटुंबीय नोकरीनिमित्त कोल्हापुरात राहतात. आप्पा हेच या कुटुंबाचे प्रमुख असून, या कुटुंबाच्या मालमत्तेची अद्याप वाटणी झालेली नाही. श्रावण याचा मोठा भाऊ, मंगल हिचापती मधुकर हे नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असून, मंगल मुलांच्या शिक्षणासाठी गावीच राहत होती. दुसरा भाऊ गुजरातमध्ये आहे. आरोपी श्रावण याला दारूचे व्यसन असून, तो गडहिंग्लज येथील एका किराणा मालाच्या दुकानात कामाला होता. दोन महिन्यांपासून तो गवंड्याकडे कामाला जात होता. त्याचे दोनही भाऊ कामानिमित्त बाहेरगावी राहतात. आई-वडील, पत्नी व मुलगा आणि मृत भावजय मंगल व तिच्या मुलांसह तो गावीच राहतो. मात्र, विभक्त राहण्यासाठी वाटणीच्या कारणावरून तो चुलते आप्पा यांच्याशी वारंवार भांडत होता.रविवारी सकाळी तो जेवणाचा डबा घेऊन गडहिंग्लजला कामावर आला होता. मात्र, दुपारी तो अचानक गावी परत गेला. जेवणानंतर चुलते आप्पा यांच्याशी त्याची वादावादी झाली. रागाच्या भरात विळा घेऊन तो आप्पा यांच्या अंगावर धावून गेला. मंगल व सरिता या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता श्रावणने रागाच्या भरात मंगलच्या मानेवर विळ्याने वार केला. विळ्याचा घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा वडरगे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगलच्या माहेरकडील दगडी शिप्पूर येथील नातेवाईक आणि वडरगे ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालय आवारात गर्दी केली होती. चुलत्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रावणविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस अधिक तपास करीत आहेत.--------खुनाची कबुलीमंगल यांच्यावर विळ्याने वार केल्यानंतर वडील चन्नाप्पा व चुलते आप्पा यांनी श्रावणला काठीने मारहाण केली. त्यात श्रावणच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तोदेखील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आला होता. त्याचवेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली.चुलत्यांनीच केला सांभाळश्रावणचे चुलते आप्पा यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना मूलबाळ नाही. एकत्र कुटुंबाचे पुढारी म्हणून श्रावण याच्यासह घरातील सर्व मुलांचा सांभाळ आप्पा यांनीच केला, परंतु तो व्यसनी असल्यामुळे आप्पा यांच्यासह श्रावणच्या वडिलांचाही त्याच्या विभक्त राहण्यास विरोध होता. श्रावणशी भांडण झाल्यामुळे त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी पाच वर्षांच्या मुलासह माहेरी दुंडगे येथे आपल्या आई-वडिलांकडे राहते. रविवारी सकाळीच तिला बोलावण्यासाठी तो दुंडग्याला जाऊन आला होता. यामुळे त्याच्या पत्नीलाही मोठा धक्का बसला आहे.मुलं पोरकी झाली..!मंगल यांची बी.एस्सी. झालेली मुलगी मोनिका ही पुणे येथील खासगी कंपनीत नोकरीस लागली आहे. ९८ टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण झालेला रोहित गडहिंंग्लज येथील एम. आर. हायस्कूलमध्ये ११वी विज्ञान शाखेत शिकत आहे. आज, सोमवारी त्याचा शेवटचा पेपर आहे. आईच्या मृत्यूमुळे रोहित व मोनिका यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
वडरगेत भावजयीचा खून; दिरास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:59 AM