कोतोली : वाघवे (ता. पन्हाळा) येथील अशोक धोंडिराम पाटील यांनी १ जानेवारी २०१५ पासून वर्षभरात वाघवे गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावावर प्रत्येकी १५०० रुपयांची ठेव ठेवणार असून, सदर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम तिला दामदुप्पट रूपाने मिळणार आहे. अशोक पाटील यांची दहावीत शिकणारी मुलगी आकांक्षा ही अल्पशा आजाराने निधन पावली. तिचे नाव कायम स्मृतीत राहावे, या उद्देशाने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत वाघवेत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावावर बॅँक आॅफ इंडिया, शाखा कोतोली येथील शाखेत रुपये १५०० ची ठेव ठेवणार आहेत. सदरच्या मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ही रक्कम दामदुप्पट स्वरूपात तिला मिळणार आहे.देशभर सुरू असणाऱ्या ‘लेक वाचवा अभियाना’स पाटील कुटुंबीयांकडून अशी ठेव ठेवल्याने मोठा हातभार लागणार आहे. या उपक्रमामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या दानशूर व्यक्तींनी हा आदर्श घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)गावातील महिलांनी आपली मुलगी जन्माला आल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबर अशोक पाटील यांच्याकडे मुलीचे नाव नोंद करावे. अशोक पाटील यांनी गावात सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असून, ग्रामपंचायत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करणार आहे.- बाजीराव उदाळे, सरपंच, वाघवे ग्रामपंचायत
वाघवेचे पाटील कुटुंब देणार ‘लेकींना’ हात
By admin | Published: December 29, 2014 9:44 PM