कोल्हापूर : कोरोनावरील बहुचर्चित व प्रतीक्षित लस अखेर कोरोना साथ आल्याच्या वार्तेला वर्षपूर्ती झाल्याच्या दिवशीच बुधवारी कोल्हापुरात दाखल झाली. ३७ हजार ५८० डोस घेऊन पुण्याहून निघालेली व्हॅक्सीन व्हॅन जिल्हा परिषदेच्या औषध भांडारात उतरवून घेण्यात आली. आता शनिवार (दि. १६) पासून जिल्ह्यातील ३१ हजार ८४६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुरुवात होणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे १४ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
चीनमध्ये कोरोना साथीने हाहाकार उडविल्याची पहिली वार्ता गेल्या वर्षी याच दिवशी प्रसिद्ध झाली. त्याच्या वर्षपूर्तीलाच त्यावर मात करणाऱ्या लसीकरणाच्या आगमनाची सुवार्ता आली. पुण्याच्या सायरस पूनावाला यांच्या सीरम कंपनीकडून भारत सरकारने अधिकृत कोवीशिल्ड या लसींचे वितरण सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत फक्त आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना लसीकरण केले जाणार असल्याने त्याप्रमाणे लसींचा कोटा निश्चित केला आहे. त्यानुसार मंगळवार (दि. १२) पासून पुण्याच्या प्रयोगशाळेतून देशभर लस घेऊन वाहने बाहेर पडली. कोल्हापुरातही साडेसदतीस हजार डोस घेऊन ही व्हॅन पोहोचली आहे. ही लस साठवण्यासाठीची कोल्डे चेनची संपूर्ण व्यवस्था औषध भांडारामध्ये केली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.
चौकट ०१
कोरोना लस दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा कृती दल समितीची बैठक घेतली. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, माता व बालसंगोपन अधिकारी फारुक देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक संस्था, वैद्यकीय संघटना, खासगी डॉक्टर्स, धर्मगुरू यांचा सहभाग लसीकरणात अग्रक्रमाने घ्यावा, अशा सूचना केल्या.
चौकट ०२
लसीकरणासाठी १४ केंद्रे निश्चित
महापालिका क्षेत्र : महाडिक माळ, सदर बझार, सावित्रीबाई फुले, पंचगंगा हॉस्पिटल, राजारामपुरी, कसबा बावडा.
ग्रामीण क्षेत्र : सीपीआर, उपजिल्हा रुग्णालय- गडहिंग्लज, सेवा रुग्णालय- कसबा बावडा, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, उपजिल्हा रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय, शिरोळ.
चौकट ०३
यांना मिळणार लस
डॉक्टर, नर्स, आशा कर्मचारी यांच्यासह आरोग्य विभागात काम करणारे सर्व स्तरांतील कर्मचारी
चौकट ०४
जादाची पाच हजार लस
जिल्ह्यात ३१ हजार ८४६ आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी पूर्ण झाली आहे. तथापि काही अडचण आल्यास जादाची म्हणून पाच हजार ७३४ लसींची जादाची मागणी केली आहे. त्याप्रमाणे ती उपलब्धही झाली आहे.