कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील कागल ते सातारा या सुमारे १२७.१५ किमी लांबीच्या सहापदरीकरणाला तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुहूर्त मिळाला. डिसेंबर २०१७ पासून तब्बल २२ वेळा सहापदरीकरणाची निविदा व शुद्धीपत्रक काढूनही तांत्रिक कारणांनी रद्दबातल केली होती. अखेर गेले अडीच वर्षे ‘जैसे थे’ स्थितीनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घातल्याने सहापदरीकरणाच्या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाला.
मुंबई ते चेन्नई (बंगलोर) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ साठी पुणे, सातारा, बंगलोर, चित्तूर आणि चेन्नई असा सुमारे १४१९ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. वाहतुकीचा ताण वाढल्याने संपूर्ण मार्गाचे सहापदरीकरण पूर्ण केले असले तरीही महाराष्ट्रातील सातारा ते कागलपर्यंतच्या सुमारे १२७ किमी लांबीच्या रस्त्याचे सहापदरीकरण काम गेले सात वर्षे रखडले. रखडलेल्या कामाची निविदा प्रक्रिया डिसेंबर २०१७ पासून सुरू झाली. पण पुढील ५३७ दिवसात तांत्रिक कारण पुढे करत ‘नॅशनल हायवे आथॉरिटी ऑफ इंडिया’ने (एनएचआय) तब्बल २२ वेळा निविदेचे शुद्धीपत्रक काढल्याने काम रेंगाळले. अखेर ती निविदा प्रक्रिया मे २०१९ मध्ये रद्दबातल ठरवली. त्यानंतर ते काम जैसे थे अवस्थेत होते. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष घातल्याने सहापदरीकरणाच्या कामाला पुन्हा मुहूर्त मिळाला. त्यामुळे गेले सात वर्षे प्रतीक्षेत असणारा सहापदरीकरण रस्ता लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
सातारा ते कागल रस्ता
- अंतर : १२७ किलोमीटर
- रोज वाहनांची ये-जा : ८० हजारांहून अधिक
- जमीन अधिग्रहण : ९८ टक्के
- -----------------
पुणे ते बंगलोर रस्ता
- २००२ : दुपदरीकरण पूर्ण
- २००५ : चौपदरीकरण पूर्ण (राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत)
- २०१४ : सहापदरी रस्ताकाम पूर्ण (सातारा ते कागलवगळता)
शनिवारी कोनशिला, लोकार्पण
- सातारा ते कागल या सहापदरीकरण कामासह विविध रस्ते कामांचा कोनशिला व लोकार्पण समारंभ शनिवारी (दि. २५) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता कराड (जि. सातारा) येथील हॉटेल द फर्न येथे होत आहे. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सभापती रामराजे नाईक, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई, खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे आदी प्रमुख उपस्थित राहाणार आहेत.
कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील ५९७१ कोटीं खर्चाचे रस्ते होणार
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सात मार्गांचे काम सुरू होत आहे. सुमारे ३३०.८० किलोमीटर लांबीचे सुमारे ५,३९८ कोटींच्या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. यामध्ये आजरा-आंबोली- संकेश्वर, कळे-कोल्हापूर यासह इतर रस्त्यांची कामेही होणार. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण ४०३ किमी लांबीच्या ५,९७१ कोटींच्या खर्चाच्या कामाला प्रारंभ होत आहे.