कोल्हापूर-शिराळा68 कि.मी.नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हाताला काम नाही, पिकाला भाव नाही, पोरगं बिनकामाचं फिरतंय, निवडणूक आली तरच उमेदवार तोंड दाखवत्यात, बाकीच्या वेळी कुणीबी फिरकत नाही. आता तर कधी निवडणूक हाय, कोण उमेदवार हेबी माहीत नाही. आमच्याकडं कवा प्रचारासाठी येत्यात याची वाट बघतोय, अशा शब्दांत मतदार मनातील खदखद व्यक्त करीत आहेत.‘हातकणंगले’ मतदारसंघांतर्गत शाहूवाडी, शिराळा मतदारसंघातील सद्य:परिस्थिती मांडण्यासाठी रविवारी ‘लोकमत’च्या टीमने कोल्हापूर ते शिराळा व्हाया बांबवडे असा एस.टी.तून प्रवास करून जनमानस जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मतदारांशी बोलताना, आजूबाजूचे वातावरण पाहताना मतदान १५ दिवसांवर आले तरी निवडणुकीचे वातावरण दृष्टीसही पडत नाही. जोतिबा दर्शन घेऊन केर्ले येथे गाडीत बसलेले शेतकरी दत्तात्रय पानसे यांना बोलते केले तर ‘शेतकऱ्यांचं तर ठरलंय, आम्ही दुसऱ्या कुणाचा विचारच करत नाही.’ असे ते म्हणाले. याचवेळी बांबवड्याकडे निघालेले अनिल चव्हाण ‘यावेळची लढाई एकतर्फी नाहीच,’ याची जाणीव करून देतात. सुयश पोवार म्हणाला, ‘अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलंय; पण नोकरीचा कॉल नाही. सरकारकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आता परिवर्तन अटळ वाटत आहे.’
उमेदवारांची वाट पाहतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:59 AM