कोल्हापूर : डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी प्रशासनाने दिलेल्या हाकेला सर्वच मंडळांनी यावर्षी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. यंदा ग्रामीण भागाबरोबरच शहरातूनही ढोल-ताशांना मागणी वाढल्याने ढोल-ताशा खरेदीसाठी अनेक पथकांवर ‘वेटिंग’ची वेळ निर्माण झाली आहे. तसेच ढोल-ताशांच्या किमतीतही यंदा पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एकाच रंगाचे शर्ट-पँट परिधान करून अनेक ढोल-ताशा पथके सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पूर्वी फक्त ग्रामीण भागात व उपनगरांतच अशी पथके होती. आता मात्र शहरातही अशा पथकांची संख्या वाढत आहे. तसेच डॉल्बीबाबत जनजागृती झाल्याने पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे. अनेक मंडळांनी स्वत:च पथके तयार केली आहेत. ढोल-ताशा पथकांत ढोल-ताशा वाजविणाऱ्यांत लहान मुलांचा मोठा सहभाग आहे. या लहानग्यांसाठी त्यांच्या आकाराचे ढोल व ताशा बाजारात आले आहेत. ढोलची किंमत ७०० रुपये पासून पुढे, तर ताशाची किंमतही ७०० रुपयांच्या पुढे आहे. नाशिक ढोल ६०० पासून पुढे आहेत. लोखंडी झांज १९० रुपयांच्या पुढे, तर पितळी झांज ५०० रुपयेपासून पुढे आहेत. शहरातील रविवार पेठ, पापाची तिकटी, टाऊन हॉल या ठिकाणी दररोज प्रत्येक विक्रेत्याकडे ३० ते ४० ढोल व ताशांची विक्री व दुरुस्ती होऊ लागली आहे. ढोल तयार करण्यासाठी लागणारे पत्र्याचे ड्रम व लोखंडी रिंगा शहरातच तयार केल्या जातात. ढोलसाठीचे चामडे पंजाब, दिल्ली येथून येते, तर फायबरचा पुट्टा पुणे, दिल्ली येथून येतो. (प्रतिनिधी)गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ढोल-ताशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यावर्षी किमतीत सात ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना ढोल, ताशे, लेझीम तयार करून देतो. मात्र, मागणी वाढल्याने त्यासाठी त्यांना थोडे थांबावे लागत आहे. - संजय व्हटकर, विक्रेते
ढोल-ताशांसाठी वेटिंग
By admin | Published: September 20, 2015 11:09 PM