* घंटागाड्यांची देखील प्रतिक्षा
संदीप बावचे
शिरोळ : येथील नगरपालिकेला अग्निशमन गाडीबरोबरच रुग्णवाहिकेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शिवाय, धूर फवारणीसाठी ट्रॅक्टर व कचरा संकलनासाठी घंटागाड्या असे देखील नियोजन पालिकेचे आहे. शहर विकासासाठी शासनपातळीवर पालिकेला निधी उपलब्ध होत आहे. दरम्यान, शहरात सांडपाण्याचा प्रश्न प्रामुख्याने ऐरणीवर आला असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची गरज आहे.
पालिकेअंतर्गत शहरात अग्निशमन केंद्राची आवश्यकता असल्याने पालिकेने ठराव करुन सुमारे एक कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारणीबरोबरच अग्निशमन गाडी व पाणी व्यवस्था असा प्रस्ताव आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने नुकताच घेतला आहे. पंधरा लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा ठराव मंजूर झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णवाहिकेची मदत नागरिकांना होणार आहे. शहरात स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर धूर फवारणी, ट्रॅक्टर खरेदी करण्याचा देखील ठराव करण्यात आला आहे. शहरातील कचरा संकलन, रस्ता स्वच्छता, ड्रेनेज स्वच्छता यासाठी पालिकेने वार्षिक दोन कोटीहून अधिक निधी खर्च करण्याची तरतूद केली आहे. सध्या घंटागाड्यांची संख्या अपुरी असल्याने कचरा संकलनास मर्यादा येत आहेत. त्यामुळे आणखी घंटागाड्यांची व्यवस्था पालिकेने करावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे. तर शहरात ड्रेनेजेचा प्रश्न गंभीर असल्याने बंदिस्त गटारी बांधून सर्व सांडपाणी एकत्र करुन त्यावर प्रक्रिया राबविणे यासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आराखड्याला पालिकेने मंजुरी दिली आहे. एकूणच शहराच्या विकासासाठी विविध ठराव पालिकेकडून होत आहेत. त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.
पालिकेसाठी नवीन गाडी
शिरोळ नगरपालिकेला चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी ठराव करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन गाडी पालिकेने खरेदी केली आहे. दरम्यान, गावठाण हद्द वाढी मोजणीला देखील लवकरच सुरुवात होणार आहे. शिवाय, कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाचे काम देखील सुरु आहे.