संदीप बावचे / शिरोळ : शिरोळ नगरपालिकेला अग्निशमन केंद्राची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सहा महिन्यांपूर्वी नगरपालिकेने शासनाकडे केंद्राच्या मंजुरीबरोबर निधीचा प्रस्ताव दिला आहे. पालिकेकडून पाठपुरावा सुरू असला तरी कोरोना आणि तांत्रिक अडचणींमुळे सध्या हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अग्निशमन गाडीबरोबरच केंद्राची उभारणी व पाणीव्यवस्था असा प्रस्ताव आहे.
शहराची लोकसंख्या ४० हजारांहून अधिक आहे. उपनगरांमुळे शहराचा विस्तार मोठा आहे. शहरालगत शेतीचा परिसर आहे. उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर आगीच्या घटना वारंवार घडतात. दत्त साखर कारखान्याकडे अग्निशमन बंबाची व्यवस्था असली तरी अन्य आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे पालिकेअंतर्गत शहरात अग्निशमन केंद्राची आवश्यकता असल्याने पालिकेने ठराव करून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. सहा महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव देण्यात आला आहे. आगीच्या घटनेवर तत्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे.
चौकट - पालिकेची स्वतंत्र व्यवस्था
अडीच वर्षांपूर्वी नगरपालिकेची स्थापना झाली आहे. पालिकेची स्वतंत्र अग्निशमन केंद्राची व्यवस्था असावी, यासाठी अग्निशमन बंबाबरोबरच केंद्राची व्यवस्था, त्याच ठिकाणी पार्किंग व बंबासाठी पाणीव्यवस्था असा सुमारे एक कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
कोट - पालिकेच्या सभेत अग्निशमन केंद्राच्या प्रस्तावाचा ठराव मंजूर करण्यात आला. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याबाबत पालिकेचा पाठपुरावा सुरू आहे.
- तैमूर मुल्लाणी, मुख्याधिकारी, शिरोळ नगरपालिका
(अग्निशमन दलाचे छायाचित्र वापरावे.)