संदीप बावचे -- जयसिंगपूर--शिक्षण संस्थांनंतर आरोग्याची पंढरी म्हणून जयसिंगपूरची ओळख आहे. सांगली, मिरजेइतकीच आरोग्य सेवा खासगी स्वरूपात याठिकाणी मिळते. शासकीय यंत्रणेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र असले, तरी दोन वर्षांपूर्वी याठिकाणी ग्रामीण रुग्णालयासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, जागेच्या मंजुरीअभावी येथील ग्रामीण रुग्णालय गेल्या वर्षभरापासून कागदावरच राहिले आहे. तालुक्यातील तिसरे ग्रामीण रुग्णालय म्हणून या रुग्णालयाची नोंद होणार असली, तरी शासन दरबारी जागेचा प्रश्न प्रलंबित पडला आहे. सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी स्थलांतरित करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सन १९६२ साली जयसिंगपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रामुळे जयसिंगपूरसह परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे.सांगली-कोल्हापूर महामार्गावर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाशेजारी सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अस्तित्वात आहे. येथे रुग्णांची मोठी गर्दी असते. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाल्यानंतर जयसिंगपूर नगरपालिकेकडे जागेसाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या इमारतीजवळील जागेत ग्रामीण रुग्णालय बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडे जागेचे हस्तांतरण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे याठिकाणी अस्तित्वात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उदगाव येथे स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उदगाव येथील शशिकला क्षय रुग्णालयामधील चार एकर जागेची प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मागणी करण्यात आली आहे. ही जागा ट्रस्टच्या नावावर असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर हस्तांतरित झाल्यानंतर जयसिंगपूर येथे गेल्या ५२ वर्षांपासून सुरू असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. सुविधा मिळण्यास मर्यादाजयसिंगपूर शहरात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत. याठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सुविधा मिळण्यास मर्यादा येत आहेत. ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आले, तर आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. खासदार, आमदार यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी प्रलंबित असणारा जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.
जयसिंगपूर ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा संपेना
By admin | Published: October 09, 2015 12:14 AM