सातारा : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपची युती तुटली आहे. आता नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसू लागली असून, शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देतील, अशी चर्चा शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. मातोश्री व कृष्णकुंजवरून काय आदेश होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्याचे जाहीर केल्यामुळे आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही पक्षांत घमासान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सातारा जिल्ह्यात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची आधीपासूनच तयारी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील जिल्ह्यातील पंचायत समितीसाठी उमेदवार शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. जावळी व कऱ्हाड तालुक्यांत पंचायत समितीच्या प्रत्येकी दोन तर कोरेगाव, खटाव, सातारा येथील प्रत्येकी एक जागा लढविण्यात येणार आहेत. उंब्रज गटातही मनसे लढणार आहे. शिवसेना व मनसे यांनी स्वतंत्रपणे उमेदवारांचा शोध घेतला आहे. (प्रतिनिधी)केवळ चर्चा सुरू झाली असताना मत व्यक्त करणे ठीक ठरणार नाही, पण शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीसह महापालिकांमध्ये स्वबळाची तयारी केलेली आहे. कोणत्याही पक्षासोबत युती करण्याबाबत पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो शिरसावंध मानून आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत. शिवसेना पक्ष चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहे.- प्रा. नितीन बानगुडे-पाटील, उपनेते, शिवसेनामहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मराठा समाज संरक्षण या मुद्द्यावर एकमताने वाटचाल करत आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास मुंबईतला मराठी माणूस प्रथमत: खूश होईल. मराठी माणसाला आणखी आधार मिळेल. सातारा जिल्ह्यातही ताकद वाढविण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते. - संदीप मोझर, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे
‘मातोश्री-कृष्णकुंज’च्या आदेशाचीच प्रतीक्षा..!
By admin | Published: January 28, 2017 10:33 PM