राजीव मुळये - सातारामुख्यत्वे हरिकथा निरूपण।दुसरे ते राजकारण।तिसरे ते सावधपण।सर्व विषयीं।।असा दृष्टिकोन ठेवून कीर्तन करणाऱ्या समर्थ रामदासस्वामींची मूळ कीर्तनशैली नारदीय असली, तरी त्यातील सामाजिक आशयामुळे ते ‘रामदासी कीर्तन’ म्हणून ओळखले जाते. या शैलीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सज्जनगडावर ‘रामदासी कीर्तनकुल’ स्थापण्याचा संकल्प रामदासस्वामी संस्थानने सोडला असून, शासनाच्या सहकार्याची आणि समाजाच्या सहभागाची अपेक्षा दासनवमीच्या निमित्ताने व्यक्त केली आहे.कर्म, उपासना, भक्ती, ज्ञान आणि मोक्ष असे पैलू डोळ्यांसमोर ठेवून रामदासस्वामींनी कीर्तनकलेकडे पाहिले. इतर संप्रदायांमध्ये भक्तिमार्ग जसा प्रमुख, तसाच रामदासी संप्रदायामध्येही; पण समाजप्रबोधन हा या कीर्तनाचा एक मुख्य उद्देश. खरे तर हा रामदासी संप्रदाय नव्हे. आत्म्याचे स्वरूप शोधणारा म्हणून समर्थांनी त्याला ‘स्वरूप संप्रदाय’ नाव दिले. बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बारा वर्षे तीर्थाटन केले. विस्कळीत समाजाची स्थिती पाहून ते विषण्ण झाले आणि त्यातूनच ‘कल्याण करी रामराया’, ‘तळमळ तळमळ होतचि आहे’ असे शब्द समर्थांनी उच्चारले. तीर्थाटन करताना त्यांनी ११०० मठ देशभरात स्थापन केले. प्रत्येक ठिकाणी महंताची नियुक्ती केली. कीर्तनकला अवगत असणे महंतपदासाठी अनिवार्य केले. पण पोट भरण्याचे साधन म्हणून कीर्तन समर्थांना अमान्य होते.‘मोले कीर्तन करू नये। मोलपुजारी होऊ नये। दिल्या द्रव्य घेऊ नये। इनाम निस्पृहें।।’ असा संदेश देतानाच समर्थांनी ‘करुणा कीर्तनाच्या लोटे। कथा करावी घडघडाटे। श्रोत्यांची श्रवणपुटें। आनंदे भरावी।।’ अशा शब्दांत कीर्तनकलेचा हेतूही स्पष्ट केला. चारशे वर्षांपूर्वी बालविधवांना जेव्हा समाजात तोंडही दाखविता येत नसे, त्या काळी आक्कास्वामी आणि वेण्णास्वामींना कीर्तनाला उभे केले. प्रबोधनाचे अधिष्ठान असणाऱ्या रामदासी कीर्तनासाठी सज्जनगडावर स्वतंत्र वास्तू असावी, त्यात या कीर्तनकलेचे आणि शास्त्राचे शिक्षण घेऊन साधकांनी जास्तीत जास्त लोकांसमोर ही शैली पोहोचवावी, अशी संस्थानची अपेक्षा आहे.शैलीचे संवर्धन आवश्यकप्रासादिक आणि नारदीय अशा दोन कीर्तनशैली असून, नारदीय कीर्तनशास्त्राचे प्रशिक्षण पुण्यात उपलब्ध आहे. प्रासादिक कीर्तनासाठी आळंदीला कीर्तनशास्त्र महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात ‘कीर्तन कोविद’, ‘कीर्तन भूषण’ अशा पदव्या साधकांना दिल्या जातात. तथापि, नारदीय कीर्तनाचीच एक महत्त्वाची शाखा असणाऱ्या आणि भक्तीबरोबरच कर्म आणि ज्ञानाचे महत्त्वही सांगणाऱ्या रामदासी कीर्तनाच्या औपचारिक प्रशिक्षणाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध नाही. यासाठी भरविली जाणारी शिबिरेही अपुरी पडतात. समर्थांच्या सज्जनगडावर असे पीठ सुरू झाल्यास साधकांबरोबरच समाजाचाही लाभ होणार असून, या कीर्तनशैलीचे जतन, संवर्धन होणार आहे. सध्या आम्ही वर्षातून एकदा कीर्तनशास्त्र शिबिर घेतो. यावर्षी दिवाळीत दुसरे शिबिर घेण्याचा मानस आहे. तथापि, ‘आपणासी जे-जे ठावे, ते-ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळजन’ हे समर्थवचन पूर्ण करण्यासाठी रामदासी कीर्तनकुलाच्या रूपाने एक संस्कारपीठ सज्जनगडावर उभे राहायला हवे. त्यासाठी समाजाच्या सहभागाची आणि शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे.- मोहनबुवा रामदासी, रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड
‘रामदासी कीर्तनकुला’ची सज्जनगडाला प्रतीक्षा!
By admin | Published: February 13, 2015 12:16 AM