सचिन लाड :सांगली :येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेहाचा पंचनामा आणि विच्छेदन तपासणी करून घेण्यासाठी नातेवाईकांना पोलीसदादांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पोलीसदादाला संबंधित तालुक्यातून येण्यास चार-चार तास लागत असल्याने मृतदेह ताटकळत ठेवावे लागत आहेत. पूर्वी रुग्णालयातील पोलीस सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात देत. मात्र आता नियम बदलल्याने त्याचा फटका मृतांच्या नातेवाईकांना बसत आहे.‘सिव्हिल’मध्ये महापालिका क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर वैद्यकीय अधिकारी संबंधित पोलीस ठाण्यांना याची माहिती देतात. त्यानंतर पोलीस येऊन पंचनामा करतात. शवविच्छेदन तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र नातेवाईकांना देतात. ही सर्व प्रक्रिया दोन-तीन तासात उरकली जाते. शहराबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला, तर मृतदेहाचा पंचनामा, शवविच्छेदन तपासणी, प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ‘सिव्हिल’मधील पोलिसांकडेच होती. नातेवाईकांचा जबाबही तेच नोंदवून घेत. आता मात्र ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरण आहे, त्या पोलिसांनी समक्ष येऊन जखमीचा जबाब व मृताचा पंचनामा करण्याचा नवीन नियम सुरू केला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या दाखल झालेल्या रुग्णांची माहिती वैद्यकीय अधिकारी पोलीस ठाण्यांना कळवित असत. मात्र ही जबाबदारी आता रुग्णालयातील पोलिसांवर सोपविण्यात आली आहे.मृत्यूचे प्रकरण त्या-त्या पोलीस ठाण्यांनी हाताळले पाहिजे, हा नियम योग्य असला तरी जत, आटपाडी, खानापूर, शिराळा या तालुक्यांतील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते येथे येण्यास किमान तीन-चार तास लागतात. तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांना पोलीसदादाची प्रतीक्षा करीत बसावे लागत आहे. सकाळी मृत झालेल्या व्यक्तीचा पंचनामा व विच्छेदन तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना मिळण्यासाठी सायंकाळी सात वाजतात. तोपर्यंत मृतदेह ताटकळत ठेवावा लागत आहे.ग्रामीण पोलिसांना झळ लागलीतालुक्यातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या तपासणीची सर्व कागदपत्रे रुग्णालयातच असत. ती नेण्यासाठीही पोलीस टाळाटाळ करत. जखमीची माहिती कळविली तरी, ते जबाब घेण्यासाठी वेळेत येत नसत. ही सर्व कामे रुग्णालयातील पोलिसांना करावी लागत होती. सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटकातील अनेक प्रकरणे रुग्णालयातील पोलिसांच्या गळ्यात पडत होती. तीन जिल्हे व कर्नाटकातील मृत्यूची प्रकरणे, तसेच न्यायालयात साक्ष देण्यासाठी जाणे आदी कामे दोन पोलीस हाताळत होते.
मृतांच्या नातेवाईकांना पोलिसांची प्रतीक्षा!
By admin | Published: January 02, 2015 11:22 PM