प्रदीप शिंदे - कोल्हापूर सर्वत्र ‘मेक इन इंडिया’चा जयघोष होत असतानाच स्वातंत्र्योत्तर काळानंतर आजही अनेक गावांत मूलभूत सुविधांची कमतरता कायम आहे. प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बससेवेपासून अजूनही जिल्ह्यातील तब्ब्ल २३ गावे वंचित आहे. या गावांना एस.टी.ची सेवा पोहोचू शकत नसल्याने परिवहन महामंडळाचे ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य केवळ कागदावरच पाहावयास मिळते. प्रवाशांना सुरक्षित व चांगल्या दर्जाच्या सुविधांसोबतच गावागावांत एस.टी. पोहोचविण्यासाठी ‘गाव तिथे एस.टी.’ची घोषणा देणाऱ्या महामंडळाची घोषणा फक्त घोषणाच राहिल्याचे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहण्यास मिळते. खराब रस्ते, कमी उत्पन्न, मुख्य रस्त्यापासून जवळ असलेले गाव यामुळे जिल्ह्यात अजूनही २३ गावांपर्यंत एस.टी. पोहोचू शकलेली नाही.डोंगराळ भागांतील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असली तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे मात्र त्या तुलनेत आजही विणले गेलेले नाही. शिक्षणासाठी अजूनही येथील विद्यार्थ्यांच्या नशिबी पायपीट कायम आहे. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा; दररोज पाच ते दहा किलोमीटर पायपीट विद्यार्थ्यांना चुकलेली नाही. याच गावांत एस. टी.ची सुविधा नसल्याने विद्यार्र्थी चालतच विद्यालयांमध्ये जातात. काहींच्या नशिबी १५ ते २० किलोमीटरची पायपीट कायम आहे. इतकेच नाही तर ज्या गावांत एस. टी. पोहोचते, त्या बसगाड्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. सीट फाटलेली, दरवाजा नाही, खिडक्या तुटक्या अशा परिस्थितीत बसगाड्या चालविल्या जातात.काही गावे मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने गावांमध्ये बस जात नाही. त्यामुळे दोन-तीन किलोमीटर दररोजची पायपीट तेथील जनतेच्या नशिबी आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये दिवसभरात बसच्या केवळ दोन ते चार फेऱ्याच केल्या जातात. गावांमध्ये बससेवा नसल्याने ‘गाव तिथे एस.टी.’हे ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाची बस जिल्ह्यातील २३ गावांपर्यंत पोहोचू शकली नाही. यात मुख्य रस्त्यापासून जवळ असल्याने, ओढा किंवा नदीपत्रात असलेली गावे, रस्तेच नसलेले किंवा रस्त्यांची खराबी असलेले किंवा काही वाड्यावस्त्यांवर उत्पन्न मिळत नसलेल्या गावांमध्ये बसफेऱ्या केल्या जात नाहीत. गावांमध्ये एस. टी. बस नसल्याने शहरात येण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी, मजूर, नोकरदार यांना पायी दुसऱ्या गावात येऊन शहरात यावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवाशांना शहरात पोहोचावे लागत असते. त्यामुळे देश जरी स्वतंत्र झाला तरी आपणास कधी सुविधा मिळणार? अशी विचारणा येथील ग्रामस्थ करीत आहेत.या गावांना एस.टी.च नाही...आजरा आगार : चित्री धनगरवाडा, गारगोटी आगार : आंबवणे. मलकापूर आगार : आंबरडे, पणुंद्रे, कुरुगळे, गेळवडे, वरेवाडी, खोतवाडी (पिशवी), भाडळे, आमटेवाडी, वरकटवाडी. संभाजीनगर आगार : वाळुली, साळवाडी, देसाईवाडी, जाधववाडी, तांदूळवाडी. गडहिंग्लज आगार : दोनेवाडी (नेसरी). राधानगरी आगार : सोनाळी, औचितवाडी. कोल्हापूर आगार : मौजे वडगाव, सादळे-मादळे, कासारवाडी.
स्वातंत्र्योत्तर काळातही २३ गावांना एसटीची प्रतीक्षा
By admin | Published: March 14, 2016 11:42 PM